मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणी मनी लॉन्ड्रींगची चौकशी करणाऱ्या ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावल्याने सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल झाल्या असून ईडीकडून चौकशी चालू आहे. मात्र यामुळे संतापलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभरात ठिकठिकाणी उग्र आंदोलन छेडले आहे. यामध्ये अनेक वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर सुरु असलेली कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या अगोदरही राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु असताना काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात आली होती.
पुण्यात काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. सरकार केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करण्यात आला. आमदार सतेज पाटील, प्रणिती शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आंदोलनामध्ये सहभागी झाले.
नाना पटोलेंसह नेत्यांचा पावसात खाली बसून निषेध, झिशान सिद्दीकी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, कार्यकर्ते गाडी समोर, पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत बाजूला केले.
केंद्र सरकार ईडीसह केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे. लोकशाही धोक्यात आल्याचे हे लक्षण आहे. आमची लढाई देश वाचवण्यासाठी असल्याची टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.