नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तसेच मृतांचा आकडा देखील चिंता वाढवणारा आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तरी देखील गेल्या काही दिवसांपासून २० हजारांहून अधिक नवीन रुग्ण सापडत आहेत.
गुरुवारी (२१ जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २१ हजार ५६६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल ५,२५,८७० वर पोहोचला आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्क लावण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच पॉझिटिव्हिटी रेट वाढून ४.२५ टक्के झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देखील १ लाख ४८ हजारांवर पोहोचली आहे.
असे असताना आता कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचा देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये काही रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांना आता सावध राहण्याची गरज आहे.