Wednesday, November 13, 2024
Homeक्रीडापंतप्रधानांनी साधला खेळाडूंशी संवाद

पंतप्रधानांनी साधला खेळाडूंशी संवाद

नवी दिल्ली (हिं.स.) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ (सीडब्लूजी) मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकातील खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. खेळाडू तसेच त्यांचे प्रशिक्षकही यावेळी उपस्थित होते. केंद्रीय युवा व्यवहार, क्रीडा, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर तसेच क्रीडा सचिव देखील याप्रसंगी उपस्थित होते. पंतप्रधानांनी, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या.

तामिळनाडूमध्ये २८ जुलैपासून बुद्धिबळ ऑलिम्पियाडही होत आहे. पूर्वसुरींनी प्रमाणेच भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्यासाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रकुल स्पर्धेत ६५ हून अधिक खेळाडू पहिल्यांदाच सहभागी होत आहेत अशी माहिती देत जोरकस कामगिरी करण्यासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. “मनापासून खेळा, जीव ओतून खेळा, पूर्ण ताकदीने खेळा आणि ताणरहीत खेळा” असा सल्ला त्यांनी खेळाडूंना दिला.

पंतप्रधानांनी संवादादरम्यान, महाराष्ट्रातील खेळाडू अविनाश साबळे यांना खेळाडू म्हणून महाराष्ट्रातून येणे आणि सियाचीनमध्ये भारतीय सैन्यात काम करणे याबाबतचा अनुभव जाणून घेतला. भारतीय लष्करातील ४ वर्षांच्या कारकिर्दीतून खूप काही शिकायला मिळाले, असे साबळे म्हणाले. भारतीय सैन्याकडून मिळालेली शिस्त आणि प्रशिक्षण आपल्याला कोणत्याही क्षेत्रात झळकण्यात मदत करेल असे ते म्हणाले. सियाचीनमध्ये काम करताना घोड्यांची अडथळे शर्यत अर्थात स्टीपलचेस क्षेत्र का निवडले, असा प्रश्न पंतप्रधानांनी त्यांना विचारला. त्यावर उत्तर देताना अविनाश साबळे यांनी सांगितले, स्टीपलचेस म्हणजे अडथळे पार करणे, त्यांनी लष्करात असेच प्रशिक्षण घेतले. एवढ्या झपाट्याने वजन कमी कसे काय केले त्याचा अनुभवही पंतप्रधानांनी विचारला. त्यावर ते म्हणाले की सैन्याने त्यांना खेळात सहभागी होण्यास प्रवृत्त केले आणि त्यामुळे स्वतःला प्रशिक्षण देण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला. त्याचमुळे वजन कमी करण्यात मदत झाली.

पंतप्रधानांनी त्यानंतर पश्चिम बंगालमधील ७३ किलो वजनी गटातील भारत्तोलक अचिंता शिउली यांच्याशी चर्चा केली. एकीकडे शांत स्वभाव तर दुसरीकडे भारत्तोलनातील शक्ती यांचे संतुलन कसे राखता? याबाबतही विचारणा केली. अचिंता यांनी सांगितले की ते नियमित योगसाधना करतात त्यामुळे मन शांत राहाते. पंतप्रधानांनी त्यांना कुटुंबाबद्दलही विचारले. त्यावर अचिंता यांनी उत्तर दिले की, ते, आई आणि मोठा भाऊ यांच्यासोबत राहातात. दोघेही सुखदु:खात समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभे राहातात. खेळताना होणाऱ्या दुखापतींच्या समस्या ते कसे हाताळतात याचीही पंतप्रधानांनी चौकशी केली. अचिंता यांनी उत्तर दिले की दुखापती हा खेळाचा एक भाग आहे आणि ते त्याबद्दल सावधगिरी बाळगतात. वेळोवेळी चुकांचे विश्लेषण करतात. त्यामुळे दुखापत झाली तरी भविष्यात त्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची खातरजमा ते करतात. पंतप्रधानांनी अंचिता यांना सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आणि अचिंता आज जिथे पोहचले आहेत त्यासाठी त्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्याबद्दल कुटुंबाचे, विशेषत: त्यांच्या आई आणि भावाचे कौतुक केले.

केरळमधील बॅडमिंटनपटू श्रीमती ट्रीसा जॉली हिच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. ट्रीसा रहिवासी असलेले कन्नूर हे शहर, फुटबॉल आणि शेतीसाठी, लोकप्रिय असताना तिने बॅडमिंटनची निवड कशी केली याबाबत पंतप्रधानांनी विचारणा केली. त्यावेळी तिने सांगितले की, तिच्या वडिलांनी तिला या खेळासाठी प्रोत्साहन दिले. गायत्री गोपीचंद हिच्यासोबतची असलेली तिची मैत्री आणि मैदानावरील दोघींचा एकत्रित सहभाग याबद्दल देखील पंतप्रधानांनी विचारपूस केली. त्याबद्दल तिने सांगितले, की तिच्या खेळातील जोडीदाराशी (फील्ड पार्टनरशी) असलेले चांगल्या मैत्रीचे नाते तिला खेळात उपयोगी पडते. परत आल्यानंतर तिचे यश साजरे करण्यासाठी तिने आखलेल्या योजनांची देखील पंतप्रधानांनी आस्थेने चौकशी केली.

झारखंडमधील हॉकीपटू श्रीमती सलीमा टेटे यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. पंतप्रधानांनी तिच्या आणि तिच्या वडिलांच्या हॉकी क्षेत्रातील प्रवासाबद्दल विचारले. आपल्या वडिलांना हॉकी खेळताना पाहून त्यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे सलीमा यांनी सांगितले. पंतप्रधानांनी त्यांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळताना आलेले अनुभव सामायिक करण्यास सांगितले. ‘टोकियोला जाण्यापूर्वी पंतप्रधानांशी झालेल्या संवादामुळे मी प्रेरित झाले होते ‘असे त्यांनी यावेळी सांगितले.

हरियाणातील गोळा फेक (शॉर्टपूट) या खेळामधील दिव्यांग क्रीडापटू शर्मिला यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला. तिच्या, वयाच्या ३४ व्या वर्षी खेळात करिअर करण्यास आरंभ करण्याच्या आणि केवळ दोन वर्षांच्या कालावधीत सुवर्णपदक मिळविण्याच्या पाठीमागे असलेल्या प्रेरणेबद्दल पंतप्रधानांनी विचारपूस केली. शर्मिला म्हणाल्या की, त्यांना लहानपणापासूनच खेळाची आवड होती, पण कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे लहान वयातच लग्न झाले आणि त्यांना पतीच्या अत्याचाराला सामोरे जावे लागले. त्यांना आणि त्यांच्या दोन मुलींना सहा वर्षे त्यांच्या आई-वडिलांकडे आसरा घ्यावा लागला होता. ध्वजवाहक असलेले त्यांचे नातेवाईक टेकचंद भाई यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि दिवसाचे आठ तास त्यांना जोमदार प्रशिक्षण दिले. पंतप्रधानांनी त्यांच्या मुलींची विचारपूस केली आणि म्हणाले, की शर्मिला केवळ त्यांच्या मुलींसाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्श आहेत. आपल्या मुलीने देखील खेळात सहभागी व्हावे आणि देशासाठी योगदान द्यावे अशी त्यांची अपेक्षा आहे, असे शर्मिला पुढे म्हणाल्या. पंतप्रधानांनी त्यांचे प्रशिक्षक टेकचंद जी यांचीही चौकशी केली जे माजी पॅरालिम्पियन आहेत; याबाबत शर्मिला म्हणाल्या, की टेकचंदजी हे, शर्मिला यांच्या संपूर्ण कारकिर्दीसाठी त्यांचे प्रेरणास्थान आहेत. शर्मिला यांचे प्रशिक्षणाप्रती असलेले त्यांचे समर्पणच शर्मिला यांना या खेळात इतके पुढे घेऊन जाऊ शकले. ज्या वयात त्यांनी त्यांची कारकीर्द सुरू केली, त्या वयात इतरांनी हार पत्करली असती असा अभिप्राय पंतप्रधानांनी दिला आणि त्यानंतर शर्मिला यांचे त्यांच्या यशाबद्दल पुनश्च अभिनंदन करत राष्ट्रकुल स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी अंदमान आणि निकोबार येथील सायकलपटू डेव्हिड बेकहॅम यांच्याशी संवाद साधला. एका दिग्गज फुटबॉलपटूचे नाव आणि त्यांचे नाव एकच असल्यामुळे त्यांना फुटबॉलची आवड निर्माण झाली आहे का, असे पंतप्रधानांनी विचारले. त्यावेळी त्यांनी उत्तर दिले की त्यांना फुटबॉलची आवड होती पण अंदमानमधील पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे त्यांना त्या खेळात सहभागी होता आले नाही. इतक्या दीर्घ कालावधीसाठी याच खेळाचा पाठपुरावा करण्यास तुम्ही प्रवृत्त कसे झालात?, असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, की आजूबाजूच्या लोकांनी खूप प्रोत्साहन दिले. ‘खेलो इंडिया’ने त्यांना कशी मदत केली, असे पंतप्रधानांनी विचारले. तेव्हा ते म्हणाले, की त्यांचा प्रवासच खेलो इंडियापासून सुरू झाला आणि पंतप्रधानांनी मन की बातमध्ये त्यांचा उल्लेख केल्यामुळे त्यांना आणखी प्रेरणा मिळाली. त्सुनामीमध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आणि लवकरच आईला गमावल्यानंतरही निराश न होता आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -