मुंबई : एकनाथ शिंदे गटातील आमदार खासदारांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे. त्याला आता शिवसेनेचे बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊ दाखवावे, असे आव्हान जाधव यांनी राऊतांना दिले आहे.
शिवसेना आमदारांनंतर आता १२ खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेना-भाजप युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठोस भूमिका न घेतल्यामुळे आपण शिवसेनेतून बाहेर पडल्याचे या खासदारांनी सांगितले आहे. यावेळी आमदारांप्रमाणेच खासदारांनीही खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेनेमुळे आम्हाला इतके सगळे मिळाले असे जर राऊतांचे म्हणणे असेल, तर येत्या काळात आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्यामध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेचे धनुष्य बाण घेऊन कुठल्याही प्रभागातून निवडून येऊन दाखवावे, असे थेट आव्हान प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना दिले आहे.
संजय राऊतांप्रमाणेच विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावरही खासदारांची नाराजी असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. लोकसभेत खासदारांना बोलण्यासाठी जो वेळ दिला जातो त्यामध्ये शिवसेनेला मिळालेल्या वेळेपैकी ७० टक्के वेळ अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांनीच घेतला आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या मतदारसंघातील विषयांवर बोलायला संधी मिळत नव्हती. त्यामुळेही आम्ही नाराज होतो, असाही आरोप त्यांनी केला आहे.