Monday, July 22, 2024
Homeमहत्वाची बातमीरानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

भारत समर्थक म्हणून ओळख

कोलंबो : श्रीलंकेत गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व आर्थिक आणि राजकीय संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज रानिल विक्रमसिंघे (वय ७३ वर्षे) यांची देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे. पोस्टल बॅलेटद्वारे झालेल्या मतदानात १३४ खासदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. विक्रमसिंघे यांच्यासमोर देशात उद्भवलेली अद्भूतपूर्व परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे मुख्य आव्हान असणार आहे. सध्या देशातील. सुमारे २२ दशलक्ष लोकांना अन्न, इंधन आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे.

देशातील आर्थिक संकट आणि जनतेच्या रोषासमोर गोटाबाया राजपक्षे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रानिल ते काळजीवाहू अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. २२५ सदस्य संख्या असलेल्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी ११३ मतांची आवश्यकता होती. विक्रमसिंघे यांना १३४ मते मिळाल्याने नवीन राष्ट्रपतींची निवड आज, बुधवारी (२० जुलै) करण्यात आली. मागील ४४ वर्षांत प्रथमच श्रीलंकेच्या संसदेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

विक्रमसिंघे यांना भारत समर्थक म्हणून ओळखले जाते. ते नवे अध्यक्ष झाल्याने भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंध सुधारण्याची शक्यता आहे. त्यांनी वेळोवेळी भारताशी सलोख्याचे संबंध राखत, द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भविष्यकाळात भारतासाठी आशादायक परिस्थिती आहे.

कोण आहेत रानिल विक्रमसिंघे

विक्रमसिंघे हे १९९४ पासून युनायटेड नॅशनल पार्टीचे प्रमुख आहेत. आतापर्यंत त्यांनी चार वेळा श्रीलंकेचे पंतप्रधान पद भूषविले आहे. महिंदा राजपक्षे २०२० मध्ये पंतप्रधान होण्याआधी रानिल हे श्रीलंकेचे पंतप्रधान होते. रानिल यांनी ७० च्या दशकात राजकारणात प्रवेश केला होता. १९७७ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. १९९३ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान होण्यापूर्वी रानिल यांनी उपपरराष्ट्र मंत्री, युवा आणि रोजगार मंत्री यासह इतर अनेक मंत्रालये सांभाळली आहेत.

‘हे’ तीन जण होते निवडणुकीच्या रिंगणात

राष्ट्रपतीपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे, दुल्लास अल्हपेरुमा आणि अनुरा कुमारा डिसनायके अशी तीन नावे प्रस्तावित करण्यात आली होती. अल्हपेरुमा हे कट्टर सिंहली बौद्ध राष्ट्रवादी आणि सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना पक्षाचे सदस्य आहेत. तर, डिसनायके हे डावे जनता विमुक्ती पेरामुनाचे प्रमुख सदस्य आहेत. गोटाबाया यांची जागा घेणाऱ्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -