पालघर (हिं.स) : महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी मोबाईल अॅप द्वारे करता येणार आहे. शेतकरी यांच्यासाठी सदर अँप उपलब्ध करून देण्यात आलेला असून, शेतकरी बंधुना ई-पिक पाहणी अॅप व्दारे आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वत: शेतात जाऊन करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास सातबारा कोरा राहून शेतकरी बंधुना कोणतीही शासकीय मदत, पिक विमा, पिक कर्ज, तसेच अनुदान प्राप्त होणार नाही.
दि ०१ जुलै, २०२२ रोजीचे शासन निर्णयान्वये खरीप २०२२ व रब्बी २०२२-२३ हंगामासाठी राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना Cup & Cap Model (८०:११०) नूसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरण्यात येणार आहे. शेतकरी पिक पेरणी बाबत स्वंयघोषणापत्र देऊन विमा योजनेत सहभाग घेत असून, प्रत्यक्ष शेतात पेरलेले पीक वेगळे असते. शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या पिकाचाच विमा घेणे आवश्यक असून, विमा घेतलेले पीक शेतात पेरले नसल्यास शेतकऱ्यांचा विमा अर्ज बाद केला जातो व त्यांनी भरलेला विमा हप्ता जप्त केला जातो आणि त्यास विमा नुकसान भरपाईचा कोणताही दावा मिळत नाही.
आता शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिका संदर्भात त्यांनी चालू हंगामात ई-पिक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहित धरण्यात येणार असल्याने जिल्हयातील सर्व शेतकरी बंधुनी ई-पिक पाहणी मोबाईल अॅप अंतर्गत पिकांची नोंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. ई-पीक पाहणीच्या अधिक माहितीसाठी आपल्या गावाचे तलाठी किंवा कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.