Thursday, November 7, 2024
Homeमहामुंबईसुमारे ११७.१४ कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक

सुमारे ११७.१४ कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एका व्यक्तीस अटक

मुंबई (हिं.स.) : खोटी खरेदीची बिजके प्राप्त करून मे. पाकीजा स्टिल एलएलपीचे भागीदार आणि मे मायल स्टिल प्रा.लि. चे संचालक सय्यद तैकीर हसन रिजवी यानी शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी केली. या प्रकरणामध्ये वस्तूंच्या वा सेवांच्या पुरवठ्याशिवाय ९९.२७ कोटी रुपयांची बनावट बीजके प्राप्त केली. यातून १७.८७ कोटी रुपयांची बनावट वजावट मिळविल्याप्रकरणी सय्यद तैकीर हसन रिजवी या व्यक्तीस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी प्रकरणी आज अटक केली आहे. या व्यक्तीस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दि. ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या अटकेसह आर्थिक वर्षातील सलग २८ अटक कारवाया महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने केल्या आहेत.

सय्यद तैकीर हसन रिजवी यांनी मे. पाकीजा स्टिल एलएलपी आणि मे मायल स्टिल प्रा. लि. या दोन बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ९९.२७ कोटी रुपयांची खोटी खरेदीची बिजके प्राप्त केली आहेत. त्यातून या व्यक्तीने शासनाची सुमारे १७.८७ कोटी रुपयांची महसूल हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांचा पुरवठा न करता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केले गेले आहे.

या प्रकरणात अन्वेषण अधिकारी डॉ. विद्याधर जगताप, सहाय्यक राज्यकर आयुक्त हे मोहन चिखले, राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. या तपासासाठी अनिल भंडारी (भा.प्र.से), सहआयुक्त, अन्वेषण-क यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यवाहीसाठी प्रशांत खराडे आणि श्रीकांत पवार या सहाय्यक राज्यकर आयुक्त आणि इतर राज्यकर निरीक्षक यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -