कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर बांदा आणि नेमळे येथे दोन नवीन पूल होणार आहेत. तर सटमटवाडी आणि इन्सूली फाटा येथे दोन मोठे बॉक्सवेलची उभारणी होणार आहे. तसेच कसाल हायस्कूल येथे नागरिकांच्या सातत्याच्या मागणीनंतर विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता फुट ओव्हर ब्रिज उभारला जाणार आहे. तर कणकवली उड्डाणपुल जोड रस्त्याचाही भाग काढून तेथे नव्याने बांधकाम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे अशी माहिती महामार्ग प्राधिकरणच्या सूत्रांकडून देण्यात आली. महामार्गावर ज्या ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र आहे, तेथे अपघात होऊ नयेत यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी महामार्ग विभाग, महामार्ग पोलीस, आरटीओ, दिलीप बिल्डकॉन, विशाल कन्स्ट्रक्शन आदी प्रतिनिधींची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. महामार्ग प्राधिकरण उपविभाग सावंतवाडीचे उपअभियंता महेश खट्टी यांनी संयुक्तरित्या सर्व विभागांना एकत्र आणून बैठक आयोजित केली होती. महामार्गावरील सर्व विभागांमध्ये समन्वय राहावा आणि महामार्ग दुरूस्तीची कामे तातडीने व्हावीत. अपघातप्रवण क्षेत्रे कमी व्हावीत यासाठी आज संयुक्त बैठक घेण्यात आली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात टाळण्यासाठी चार नव्या कामांना मंजूरी मिळाली आहे. यात बांदा आणि नेमळे येथील नवीन पुलांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. तर इन्सुली फाटा आणि सटमटवाडी येथे माेठे अंडरपास बांधले जाणार आहेत. या कामांनाही केंद्राकडून मंजूरी मिळाली आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू असून पावसाळा संपताच या कामांना सुरवात होणार आहे.
कसाल येथे नागरिक तसेच शाळातील मुलांना महामार्ग ओलांडताना खूप समस्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे हायस्कूल परिसरात फुटओव्हर .बिज्र होणार आहे. त्याबाबतची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. हा पूल देखील पावसाळयानंतर उभारला जाणार आहे. महामार्गावर कुठेही पाणी साचून राहू नये. डांबरी रस्त्यावर जेथे जेथे खड्डे पडले आहेत, ते तातडीने बुजविले जावेत. ज्या ठिकाणी पथदीप बंद आहेत ते तातडीने सुरू केले जावेत आदीच्या सूचनाही दिलीप बिल्डकॉनला दिल्या असल्याचे सांगण्यात आले.
कणकवलीतील उड्डाणपूल रस्ता दुरूस्त होणार
कणकवली शहरतील उड्डाणपुल जोड रस्ता गेली दोन वर्षे पावसाळ्यात खचला. आता पावसाळा संपल्यानंतर जोडरस्त्याचा खचलेला भाग पूर्णत: काढून तेथे नवीन बांधकाम केले जाणार आहे. खचलेल्या भागाच्या ठिकाणी प्लेट लावण्यात येणार आहेत. या कामासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्या कालावधीत वाहतुकीचे नियोजनही लवकरच केले जाणार आहे. यापूर्वी झाराप ते कणकवली पर्यंत असलेले सर्व अनधिकृत मिडलकट बंद करण्यासाठी कार्यवाही सुरू केली होती. यात चार अनधिकृत मिडलकट बंद करण्यात आले. मात्र त्यानंतर स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध झाल्याने हे काम थांबविण्यात आले. आता पोलीस बंदोबस्तात पुन्हा अनधिकृत मिडलकट बंद करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहेत. तसेच कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज वरून कोसळणारे पाणी तातडीने बंद करण्याच्या सूचना देखील ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत. याबाबत कार्यवाही न झाल्यास कंपनीला पुढील कारवाईला सामोरे जावे लागेलं असा इशारा देखील देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.