मुकुंद रांजाणे
माथेरान : माथेरानसारख्या दुर्गम अशा पर्यटनस्थळाला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून १२३ कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त झाल्यामुळे इथली विकासकामे एमएमआरडीएमार्फत मार्गावर लागलेली दिसत आहेत; परंतु होत असणाऱ्या कामांवर कुणाचाही अंकुश अथवा देखरेख नसल्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने अन् घाईगडबडीत सर्व ठिकाणी कामे सुरू आहेत त्यामुळे ही कामे फार काळ तग धरू शकणार नाहीत, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिकांमधून नाराजीचे सूर अप्रत्यक्षपणे व्यक्त होताना दिसत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झालेला असताना तो खर्च करताना प्रामुख्याने नगर परिषदेच्या अधिकारी वर्गाने कुठल्याही प्रकारे लक्ष केंद्रित केलेले नाही की होणारी कामे कशा प्रकारे पूर्ण होत आहेत. याबाबत गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळेच ही कामे जास्त काळ टिकू शकणार नाहीत.
रस्त्यावर लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक हे चांगल्या दर्जाचे आहेत किंवा कसे याबाबत सुद्धा इथल्या तज्ज्ञ, अतिहुशार राजकारणी मंडळींनी सुद्धा काहीएक स्वारस्य दाखविलेले नाही. गावाची महत्त्वाची कामे म्हणजे रस्ते विकास हाच विकास पूर्ण होत असताना त्यावर पक्षीय भेदाभेद न करता गावाच्या हिताच्या दृष्टीने लक्ष देणे गरजेचे होते; परंतु तसे झाले नाही श्रेयवाद हाच या गावाला लागलेला शाप असल्याने मैत्रीपूर्वक राजकारण करत गावाला अधोगतीकडे नेण्यास राजकीय मंडळी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. होणाऱ्या कामांवर कुणाचाही आक्षेप वा तक्रारी येत नाहीत नागरिकांना एक प्रकारे दिखावा म्हणून तात्पुरता विरोध दर्शवून या कामांकडे राजकारण्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्यामुळे एमएमआरडीएने कामाचा सपाटा सुरू ठेवला होता. निविदेच्या कामातील क्वांटिटी पूर्ण करण्यासाठी अनावश्यक ठिकाणी सुद्धा गॅबियन वॉल बांधण्यात आलेल्या आहेत, तर इथे मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असते. याची कल्पना असताना सुद्धा पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आलेले नाही.
त्यामुळे पावसाळी पाणी रस्त्यावरून वाहत होते. याकामी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेले कठडे तोडून पाणी जायला मार्ग मोकळा केला गेला आहे. त्यातही जिथे उताराची जागा आहे त्या ठिकाणी जागा न करता चढावाच्या ठिकाणी कठडे तोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात रस्त्याचे क्ले-पेव्हर ब्लॉक हे हळूहळू निखळून जाणार आहेत. एकीकडे नगर परिषदेचे अधिकारी हा मुख्य रस्ता एमएमआरडीएकडून काम पूर्ण झाल्यावर हस्तांतरित होण्याची वाट पहात आहेत; परंतु हे सर्व रस्ते नगर परिषदेच्या अखत्यारीत येत आहेत याची त्यांना कल्पना नाही का? एमएमआरडीएच्या ठेकेदारांची हे अधिकारी वर्ग, राजकीय मंडळी पाठराखण तर करीत नाहीत ना? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे ठेकेदार घाईगडबडीत कामे उरकून निघून जाणार आहेत; परंतु भविष्यात ह्याच रस्त्यांची डागडुजी नगर परिषदेच्या खर्चातून करावी लागणार आहे.
माथेरानमधील चढ-उतार असणारे रस्ते लक्षात घेता करोडो रुपये खर्च करीत असता एमएमआरडीएसारख्या मान्यता प्राप्त संस्थेने पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित कसा होईल? हे पाहणे गरजेचे होते तसेच सांडपाण्याचा निचरा, भूमिगत विद्युतवाहिन्या याचे नियोजनबद्ध काम अपेक्षित होते; परंतु हे नियोजन कागदावर राहिले आहे. आता तरी निदान मुख्य रस्त्याचे म्हणजेच टपाल पेटी ते पांडे रोडपर्यंतच्या रस्त्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात यावे. – शिवाजी शिंदे, माजी विरोधी पक्षनेते, माथेरान नगर परिषद