Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीकोकणला बदनाम करणारा खासदार निवडून गेल्याचे दुःख वाटते : निलेश राणे

कोकणला बदनाम करणारा खासदार निवडून गेल्याचे दुःख वाटते : निलेश राणे

पेटी वाजवून सभ्यपणाचा आव आणणाऱ्या राऊतांचे हात लोकांच्या खिशात

रत्नागिरी (प्रतिनिधी) : पैसे आणि सोन्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार असलेल्या विनायक राऊत यांचे हात लोकांच्या खिशात जातात, असं त्यांच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी आता बोलत आहेत. हे ऐकून फार आश्चर्य वाटलं नसलं तरीही खासदारकीची वैभवशाली परंपरा असलेल्या या मतदार संघासह अवघे कोकण हे या पेटी वाजवून सभ्यपणाचा आव आणणाऱ्या माणसामुळे बदनाम होते आहे, असा संताप भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करत विनायक राऊत यांचा समाचार घेतला आहे. त्यांच्याच पक्षाचे आमदार हेमंत पाटील यांनी विनायक राऊतांनी बांगर यांच्याकडून चेन घेतल्याचा गौप्यस्फोट केला. त्याआधीच आमदार राजेश क्षीरसागर यांनीही राऊतांचे कारनामे उघड केले होते. या सगळ्या घडामोडीनंतर निलेश राणे यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

निलेश राणे यांनी म्हटले आहे की, खासदार विनायक राऊत यांच्याबद्दल जे काय मागच्या पंधरा दिवसांपासून त्यांच्याच पक्षातले सहकारी आमदार, खासदार बोलतात ते ऐकून माझ्यासारख्या माणसाला आश्चर्य वाटलं नाही, कारण मला माहीत होतं की हा माणूस तसाच आहे. पण वाईट या गोष्टीचे वाटते याच्यामुळे कोकणचे नाव खराब झाले. हा माणूस कोकणातून निवडून जातो, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा खासदार आहे, असा माणूस महाराष्ट्रात बदनाम होणे हे आमच्या मातीसाठी, आमच्या कोकणसाठी ऐकायला बरे वाटत नाही.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक गोष्टीसाठी हा माणूस पैसे खातो. प्रवासासाठी पैसे, हॉटेलसाठी पैसे, तिकीट द्यायला पैसे, स्वतःच्या निवडणुकीसाठी पैसे हा माणूस घेतो आणि जर पैसे मिळाले नाहीत तर, अंगावर चेन किंवा जे काही सोनं असतं, ते पण लुटतो. असा आमच्या कोकणातून कधीच कोणी माणूस निवडून गेला नव्हता. पहिल्यांदाच कोकणला बदनाम करणारा माणूस आज खासदार म्हणून तिकडे निवडून गेलाय या गोष्टीचे दुःख वाटते. एवढे पैसे असूनही एवढी वर्षे लोटून सुद्धा कधी त्या माणसाने कोकणामध्ये कधी संस्था उभी केली नाही. ना कधी कुठली फॅक्टरी उभी केली. ना पाचजणांना नोकऱ्या दिल्या नाहीत, ना पाच आरोग्य विषयी, कॅन्सर पेशंटना, डायलिसीससाठी कधी मदत केली. खेळाडूंना मदत केली नाही. तुम्हाला एकही असे उदाहरण कुठल्याही गावात भेटणार नाही किंवा शहरात भेटणार नाही की या माणसाने मला मदत केली असेल सांगेल.

दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत हा माणूस निवडून आला. पण एवढ्या ताठ मानेने असं दाखवतो की, त्याच्यासारखा पेटी वाजवणारा कोणच नाही. पण खरे धंदे हे, इथून तिथून लोकांच्या खिशात हात घालून पैसे काढणे, सोनं लुटणे. असं कधी खासदार करतो, असं मी ऐकलेलं नाही. जगाच्या नकाशामध्ये असा कुठला खासदार लोकांच्या अंगावरच सोनं काढून घर चालवतो, असं मी कधी बघितलेलं नाही. त्यामुळे जेव्हा संधी येईल तेव्हा योग्य न्याय आपण अशा माणसाला द्या आणि योग्य ती जागा या माणसाला दाखवा, असे आवाहन निलेश राणे यांनी जनतेला केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -