अमरावती (हिं.स.) : मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणा-या चुनखडी आरोग्य उपकेंद्रामध्ये नुकतेच ५० वर्षीय सुदाम बुडा कासदेकर याला अतिसार व उलट्या सुरू झाल्या. त्याला चुनखडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, परंतु त्या ठिकाणी डॉक्टर व नर्स नसल्यामुळे तसेच रुग्णवाहिका सुद्धा नसल्यामुळे नातेवाईक प्राथमिक आरोग्य केंद्र काटकोन येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.
चुनखडी येथे भरारी पथकात एक वर्षापासून डॉक्टर नसल्यामुळे, तसेच या ठिकाणी रुग्णवाहिका सुद्धा नसल्यामुळे रुग्णाला उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कोयलारी व पाचडोंगरी पाठोपाठ आता या परिसरातील अनेक गावात कॉलराची साथ पसरत असल्याची माहिती पुढे येत आहे. अनेक गावातून रुग्ण निघत असून या परिसरातील या पाचव्या व्यक्तीचा आता मृत्यू झाला असल्याने एकच खळबळ या परिसरात उडाली आहे तर आरोग्य प्रशासन आता तरी रिक्त असलेल्या जागा भरेल का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
याबाबत बोलताना काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. रागेश्री माहुलकर म्हणाल्या की, कॉलरा सदृश्य आजाराने चुनखडी येथील व्यक्तीचा आज सकाळी चारच्या दरम्यान मृत्यू झाला. आम्ही सगळ्या गावात कॅम्प लावला असून सगळ्या रुग्णांची तपासणी सुरू आहे, मात्र हा व्यक्ती शेतात राहात असल्यामुळे आम्ही त्याची तपासणी करू शकलो नाही. याबाबत रात्री एकच्या सुमारास फोन आला. मी लगेच खडीमल येथून गाडी पाठवली आणि रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंभ येथे बोलवून घेतले, परंतु येतांना रस्त्यातच मृत्यू झाला होता.