मुंबई (हिं.स.) : पावसामुळे वारंवार येणा-या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात आपत्ती विषयक मदत व बचाव कार्यासाठी असलेल्या यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर कार्यरत आहेत. त्याचा दररोज आढावा मी स्वत: घेत आहेच. पूर ओसरल्यानंतर जलजन्य आजारांचा फैलाव वाढू नये म्हणून स्थानिक आरोग्य यंत्रणांनी तात्काळ खबरदारी घ्यावी. नद्यांची पात्रे गाळ साचल्यामुळे उथळ झाली आहेत. पात्रांचे खोलीकरण व रूंदीकरण केल्याने नद्यांचे प्रवाह पूर्ववत होण्यासाठी मदत होईल यासाठी जलसंपदा विभागाने नदया तसेच धरणे यातील गाळ काढण्याबाबत योग्य ती कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पूरग्रस्त भागात पूरामुळे ज्या नागरिकांचा मृत्यू ओढवला त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ मदत वितरीत झाली आहे. तरीही जे लोक या आपत्तीत जखमी असून उपचार घेत आहेत त्यांच्यावर उपचार देखील वेळेत होण्याबाबत खबरदारी घेण्यात यावी. पूरग्रस्त भागातील शेती तसेच इतर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून त्याचे प्रस्ताव शासनाला सादर करा. कोणताही आपत्तीग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी प्रशासकीय यंत्रणांनी घ्यावी. राज्यात पावसामुळे झालेल्या १०९ मृत्यू पैकी साठ टक्के मृत्यू हे वीज पडून झालेले आहेत. त्यामुळे पावसाळयात अंगावर वीज पडून मृत्यू होवू नयेत यासाठी वीज अटकाव यंत्रणा ही देखील प्रभावीपणे राबविण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार मदत व पुनर्वसन विभागाने काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत केल्या.
यावेळी गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात पूरस्थिती तसेच मदत व बचावकार्याची सविस्तर माहिती बैठकीत दिली.