वाडा (वार्ताहर) : आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालवण्यात येत आहेत. तालुक्यातील आमगाव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थाना एकाच खोलीत राहण्याची व्यवस्था व तेथेच शिक्षणाचे धडे गिरवावे लागत असल्याने विद्यार्थाची प्रचंड गैरसोय होत आहे. या प्रकाराने आदिवासी विकास विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वाडा तालुक्यातील आमगाव येथे आदिवासी विभागाकडून शासकीय आश्रमशाळा चालविण्यात येत आहे. या आश्रम शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे आमगाव जवळच असलेल्या कुमदळ या गावात भाड्याच्या जागेत सदरील आश्रमशाळा शाळा भरवली जात आहे. येथे एक हॉल व दोन खोल्यांमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थाना शिक्षणाचे धडे तसेच राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचे वर्ग असून एकूण ३०३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये १३० मुले व १४३ मुली आहेत. त्यापैकी २७३ विद्यार्थी या शाळेतच वास्तव्यास आहेत. तर उर्वरित विद्यार्थी आजूबाजूच्या गावातून येतात. या जागेतील हॉलमध्येच पार्टीशन करून आठ खोल्या तयार केल्या आहेत. या खोल्यामधून दोन- दोन पार्टीशन मध्ये येण्या जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जागा कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या ये जामुळे शिक्षणात अडथळा निर्माण होत असतो. शिवाय या खोल्यांमध्येच शिक्षणाचे धडे व राहण्याची व्यवस्था असल्याने शिक्षणाचे वातावरण निर्मित होत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. शिवाय येथेच विद्यार्थ्यांचे कपडे देखील वाळविण्यात येतात. त्यामुळे अशा दाटीवाटीने कसेबसे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
मुली व मुलांसाठी स्वतंत्र अशी फक्त पाच स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे एवढ्या विद्यार्थाना ती अपूरी पडत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. तर येथील स्वच्छतागृहाच्या छप्पराचे पत्रे तुटलेले असून पाऊस सुरू असताना त्यातून पाणी गळत असते. एकंदरीत गैरसोयीच्या विळख्यात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. यासंदर्भात आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अरविंद किणी यांच्याशी संपर्क केला असता, आश्रमशाळेच्या नवीन इमारतीचे काम सुरू असल्यामुळे सध्या आम्ही भाड्याने राहात आहोत. असे सांगून अधिकचे बोलणे त्यांनी टाळले.