नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच कोडीन आधारित कफ सिरपच्या निर्मिती आणि विक्रीवरील बंदीचा निर्णय घेऊ शकते. यासंदर्भातील धोरणाचा सध्या आढावा घेतला जात आहे. कफ सिरपचा औषधापेक्षा नशेसाठी जास्त वापर होत असल्याचा मुद्दा उपस्थितीत करत अनेक खासदारांनी चिंता व्यक्त केली होती.
कोडीन असलेल्या कफ सिरपवर बंदी घालण्याची मागणी या खासदारांनी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली होती. त्याआधारे आरोग्यमंत्र्यांनी मार्चमध्ये ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला या प्रकरणाचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देण्यास सांगितले होते. आता डीसीजीआयने आढावा अहवाल आरोग्य मंत्रालयाला दिला आहे.
कोडीन हे अफूपासून बनविलेले एक वेदनाशामक आहे, जे सामान्यतः खोकला, वेदना आणि अतिसाराच्या उपचारांमध्ये वापरले जाते. हे अफूच्या अर्कामध्ये आढळणारे नैसर्गिक वनस्पती-व्युत्पन्न अल्कलॉइड आहे. कोडीन वापरून बनवलेले काही सुप्रसिद्ध ब्रँड म्हणजे फायझर कंपनीचे कोरेक्स, अॅबॉटचे फेन्सेडिल आणि लॅबोरेट फार्मास्युटिकल्सचे एसकाफ. उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक यांसारख्या अनेक राज्यांमध्ये त्यांचा सर्वाधिक वापर केला जातो, असे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.