Sunday, July 14, 2024
Homeदेशशिंदे गटाकडून उद्धव गटाला आणखी एक धक्का!

शिंदे गटाकडून उद्धव गटाला आणखी एक धक्का!

शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला शिंदे गटाचे पत्र

नवी दिल्ली : राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी अनपेक्षितपणे घडत असताना शिंदे गटाकडून उद्धव गटाला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. लोकसभेच्या गटनेते पदी राहुल शेवाळे यांच्या नेमणूकीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिल्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी आता निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असल्याचे समोर येत आहे. या पत्रात शिंदे गटाने शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, अशी विनंती केली आहे.

शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिले असून आमच्याकडे दोन तृतियांश संख्याबळ आहे. ५० आमदार आणि १२ खासदारही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे आम्हीच शिवसेना असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले.

दरम्यान, विधानसभेतील आमदारांमध्ये फूट पडल्यानंतर आपण शिवसेना सोडली नसून सर्वजण शिवसेनेतेच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सरकारदेखील स्थापन केले. त्यानंतर अनेक पदाधिकारी, नगरसेवक, खासदार शिंदे गटात सहभागी झाले. तर तिकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून बंडखोरांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर शिंदे गटाने ठाकरे यांच्या नेतृत्वातील कार्यकारणी बरखास्त केल्याची घोषणा करून स्वतःची नवी कार्यकारणी जाहीर केली. या नव्या कार्यकारणी नंतर शिंदे गट आता आपला शिवसेनेवर दावा करणार असल्याची चर्चा होती.

तर शिंदे गटातील खासदारांकडे लोकसभेचे गटनेतेपद गेल्यानंतर या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला मंगळवारी रात्री उशिरा एक पत्र दिले. या पत्रात बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी असून त्यांना मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -