मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे एकूण ५८ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मुंबईला नवी ओळख देणारा आणि मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला तसेच मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी असा मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे एकूण ५८ टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पातील एकूण १११ पैकी १०७ हेक्टर म्हणजे ९७ टक्के भरणीचे काम, तर तटीय भिंतीचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान संपूर्ण किनारा रस्ता प्रकल्प नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे. त्यादृष्टीने पालिकेकडून वेगाने काम सुरू आहे. सागरी किनारा रस्ता प्रकल्प हा मरिन लाईन ते कांदिवलीपर्यंत आहे. मात्र या प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांद्रे सागरी सेतूपर्यंतच्या मार्गाचे काम मुंबई महानगरपालिका करत आहे. या मार्ग अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान प्रत्येकी २.०७० किलोमीटर अंतराचे जाण्या-येण्यासाठी दोन बोगदे बांधण्यात येत असून त्यापैकी प्रियदर्शनी पार्क येथून नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी पहिल्या बोगद्याचे खणन आधीच पूर्ण करण्यात आले होते.
दुसऱ्या बोगद्याचे काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाले असून आतापर्यंत दुसऱ्या बोगद्याचे ३९ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलांखाली बांधण्यात येणाऱ्या ४० टक्के खांबांची कामे देखील पूर्ण झाली आहेत. सागरी किनारा मार्ग प्रकल्प सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. अवघ्या काही मिनिटांत दक्षिण मुंबईचे टोक गाठता येणार आहे. दरम्यान या प्रकल्पाचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस असून वेगाने काम सुरू आहे.