नवी दिल्ली : गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यासाठी आणि भाजप सरकार पाडण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात ५ लाख रुपये आणि ४८ तासांनंतर २५ लाख रुपये देण्यात आल्याचा दावा रईस खान पठाणने माध्यमांशी संवाद साधताना केला. मी तीस्ता सेटलवाड आणि अहमद पटेल यांच्या डीलचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे, असे पठाण म्हणाले.
काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या इशाऱ्यावरून २००२च्या जातीय दंग्यानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार पाडण्याचे मोठे कारस्थान रचले होते. या कारस्थानात सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व इतर काही लोक सामील होते, असा दावा गुजरात पोलिसांच्या एसआयटीने अहमदाबादच्या सत्र न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. तसेच, अहमद पटेल हे काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते. पटेल यांच्याकडून तिस्ता सेटलवाड यांनी ३० लाख रुपये घेतले होते, असे एसआयटीने म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांचे माजी सहकारी रईस खान पठाण यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. पठाण यांनी दावा केला की, मी आणि तीस्ता यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. तेव्हा सोनिया गांधी यांनी तिस्ता यांच्याकडे निधीची कमतरता आहे का, असा सवाल केला होता. पठाण यांनी सोनियांकडे एसआयटी चौकशीची मागणीही केली आहे.
यासोबतच, अहमद पटेल यांनी नरेंद्र भ्रमभट्ट यांच्याकडून तीस्ताला हे पैसे दिले आणि सांगितले की निधीची कमतरता कधीच भासणार नाही, फक्त उद्देश लक्षात ठेवा. पठाण यांच्या म्हणण्यानुसार, अहमद पटेल यांनी मोदींना तुरुंगात टाका आणि सरकार पाडा, असे म्हटले होते.
तसेच, तीस्ता आणि मी सोनिया गांधींना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटलो होतो, तेव्हा सोनियांनी तिस्ता यांना विचारले होते की निधीमध्ये काही अडचण आहे का? यावर अहमद पटेल यांच्यासोबत सर्व काही होत आहे. असे उत्तर तीस्ता यांनी दिले असल्याचे पठाण यांनी म्हटले आहे. यासोबतच, एसआयटी सोनिया गांधी यांची चौकशी करून सर्व काही स्पष्ट करेल. असेही रईस खान पठाण यांनी यावेळी सांगितले.