Monday, March 17, 2025
Homeताज्या घडामोडीशिवसेना पत्त्यासारखी कोसळतेय, हे पहावत नाही

शिवसेना पत्त्यासारखी कोसळतेय, हे पहावत नाही

५२ वर्षे पक्षात काम करणारा नेता राजीनामा का देतो? ही वेळ आमच्यावर का आली? याचा विचार कोण करणार?

बंडखोर नेते रामदास कदम यांचे सवाल

मुंबई : गेली ५२ वर्षे मी शिवसेनेसाठी झोकून देऊन काम केले. आम्ही कष्टाने शिवसेना उभारली. मात्र, आज तीच शिवसेना आमच्या डोळ्यांदेखत पत्त्यासारखी कोसळत आहे. आयुष्याच्या संध्याकाळी हे सर्व पाहण्याची वेळ आमच्यावर आली आहे. हे आमच्यासाठी खूप वेदनादायी आणि दु:खदायी आहे. गेल्या महिनाभरापासून आम्हाला झोप लागत नाही, जेवण जात नाही. रात्री-अपरात्री मी झोपेतून उठून बसत आहे, अशा शब्दांत शिवसेनेतून हकालपट्टी झालेले बंडखोर नेते रामदास कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. मी ५२ वर्षे पक्षासाठी झोकून देऊन काम केले. राज्यातील शिवसैनिक याचे साक्षीदार आहेत. मात्र, आज माझ्यावर शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल, असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे, आयुष्याच्या संध्याकाळी पक्षाच्या माध्यमातून आमचे भविष्य अशाप्रकारे अंध:कारमय होईल, असे वाटले नव्हते. गेल्या महिनाभराचा वेळ माझ्यासाठी फार वाईट होता. मला झोप लागत नाही, जेवण जात नाही. मी शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन आनंदी नाही, खुश नाही, समाधानी नाही. बाळासाहेब ठाकरे आजही माझ्या डोळ्यांसमोर दिसत आहेत, मला प्रचंड वाईट वाटत आहेत. पण ही वेळ आमच्यावर का आली, याचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला पाहिजे. ५२ वर्षे पक्षात काम करणारा नेता राजीनामा का देतो, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. मी शिवसेनेच्या पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला एक फोन करायला पाहिजे होता. तुम्ही इकडे या, आपण बसून, बोलूया, असे उद्धव ठाकरे बोलतील, ही माझी अपेक्षा होती. पण उद्धव ठाकरे यांनी माझी पक्षातून हकालपट्टी केली. आम्ही केलेल्या मेहनतीमुळे तुम्ही खुर्चीवर बसलात, हे उद्धव ठाकरे यांनी विसरु नये, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.

एकेकाळी ‘मातोश्री’चे निष्ठावंत असलेल्या आनंदराव अडसूळ यांनी मागील आठवड्यात शिवसेना पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला तर आज आजन्म पक्षाशी गद्दारी करणार नाही म्हणणाऱ्या रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या कारभारावर जाहीर टीका करुन शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. या दोघांनी ठाकरेंशी घेतलेल्या पंग्यामुळे पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेऊन उद्धव ठाकरे यांनी दोघांचीही शिवसेनेतून हकालपट्टी केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -