नवी दिल्ली : एकनाथ शिंदेंची भेट घेताच शिवसेना खासदारांना १२ हत्तींचे बळ आले असून ते आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटले. यावेळी शिंदे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे लेखी पत्र दिले. या पत्रात त्यांनी दोन मागण्या केल्या आहेत. विनायक राऊत यांच्याकडे गटनेतेपद आहे, ते राहुल शेवाळेंना आम्ही निवडले आहे. त्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच आम्हाला शिवसेनेचे कार्यालय नको, नवीन कार्यालय द्यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, शिवसेना खासदारांनी वेगळी चूल मांडल्यामुळे ठाकरे गटास आता कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागेल.
मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत १२ खासदारांचा शिंदे गटाला पाठिंबा
राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता दिल्लीतही पक्षाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी वेगळी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी खासदार राहुल शेवाळे यांची शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते म्हणून केली. तसेच खासदार भावना गवळी मुख्य प्रतोद असल्याचेही ते म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना १२ खासदारांनी याबाबतचे पत्र दिले असल्याचीही माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.
“जी आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेतली. तिच भूमिका दिल्लीत हे खासदार घेत आहेत. याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. जनतेच्या मनातले सरकार आम्ही राज्यात स्थापन केले आहे आणि याचे स्वागत या १२ खासदारांनीही केले आहे. उद्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील केस कोर्टात आहे. त्या कामासाठी मी येथे आलो होतो. त्यासोबतच या खासदारांचे स्वागतही करण्यासाठी येथे आलो आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
ईडी आणि केंद्रीय यंत्रणांच्या दबावापोटी खासदार फुटले आहेत अशी टीका संजय राऊत यांच्याकडून केली जात आहे. याबाबत बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी सणसणीत टोला लगावला. “दुसरं कोण बोललं असतं तर मी बोललो असतो. पण संजय राऊत काही दखल घेण्यासारखे नाहीत”, असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच संजय राऊत रोज सकाळी मॅटिनी शो घेतात. त्यांच्या बोलण्याला काय महत्व द्यायचे?, असेही ते म्हणाले.
या १२ खासदारांचा शिंदे गटाला पाठिंबा
राहुल शेवाळे, हेमंत पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, प्रताप जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे आणि श्रीकांत शिंदे या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.