मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मुंबईतील रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लागू केले असून, या निर्बंधामुळे ठेवीदारांना खात्यातून केवळ १५ हजार रुपयेच काढता येणार आहेत.
बँकेच्या रोख मूल्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी बँकेवर निर्बंध आणण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. लादण्यात आलेले हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असतील असे आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निर्बंध लागू करण्यात येत असल्याने बँकेतील बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्याच्या ठेवीधारांना खात्यातून केवळ १५ हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यापेक्षा अधिकची रक्कम ठेवीदारांना काढण्यावर निर्बंध असतील असेही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बँकेवर फक्त निर्बंध लावण्यात आले असून त्यांचा बँकिंग परवाना रद्द केलेला नसल्याचेही आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. तसेच जोपर्यंत बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत संबंधित बँक निर्बंधांसह दैनंदिन कामकाज करू शकणार आहेत.