रत्नागिरी (हिं.स.) : जयगड समुद्रात उलटलेले सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीची अजस्र नौका लाटांच्या तडाख्याने उलटली असून ती सोमवारी मध्यरात्री गुहागरच्या समुद्रकिनारी आली आहे. नौका उलटली असली, तरी प्राणहानी झालेली नाही. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी उगलमुगले आणि गोसावी यांनी या घटनेची नोंद घेतली आहे. ते पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.
सिंगापूर येथील तेल कंपनीची तेलवाहू नौका गेल्या २२ जून रोजी कोलंबो येथून निघाली. ती समुद्रात कलंडल्याने त्याचा समुद्रातील संपर्क तुटला होता. गेल्या ९ जुलैपासून रडारवर या नौकेचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे नौकेचा शोध सुरू होता.
ही नौका रत्नागिरी तालुक्यातील जयगडजवळच्या खोल समुद्रात किनाऱ्यापासून १३ सागरी मैलांवर काल तटरक्षक दलाला आढळली होती. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही नौका पूर्णपणे उलटली. त्यामुळे त्यातील तेल आणि इतर वस्तू समुद्रात वाहून गेल्या. नौकेवरील कर्मचारी मात्र सुखरूप आहेत. किनाऱ्यावरील नागरिकांनी या नौकेतून वाहत वाहत किनाऱ्यावर आलेल्या वस्तूंना हात लावू नये. तसेच काही संशयित वस्तू आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.