Tuesday, September 16, 2025

अंतर्मनातील आवर्त

अंतर्मनातील आवर्त

प्रवीण पांडे

मानवी मन ही ईश्वराने निर्मिलेली अद्भुत किमयाच आहे. तसे तर संपूर्ण सृष्टी आणि त्यामध्ये असणारा प्रत्येक अणू नि रेणू हे त्या किमयागाराने निर्मिती केलेल्या अद्भुत आणि अगम्य अशा अनेक विश्वांचं संग्रहालयच जणू. अशा या भव्य-दिव्य संग्रहातील मानव हा एक लहानसा घटक. अशा या मानवाला परमेश्वराने भरभरून दिलंय. शरीरासोबतच दिली आहे तरल अशी बुद्धिमत्ता, त्याद्वारे वैचारिक शक्ती, क्रियाशिलता आणि मन. अशा या मनाचा वापर कसा करावा किंवा केला जातोय आज?

मन ही अतिशय गतिमान असणारी संकल्पना आहे. क्षणात इकडे, क्षणात तिकडे. तसे पाहता मनाला व्याप्ती आणि मर्यादांचे बंधन असत नाही. ते अनिर्बंध (स्वैर) असते. मनात येणारे (उत्पन्न होणारे) विचार हे कशाही स्वरूपात प्रकटत असतात. हे विचार चांगले, वाईट, आनंददायक, क्लेशकारक आणि कसेही असू शकतात. या विचारांवर अवलंबून शरीराच्या आणि पर्यायाने मनाच्या अनेक क्रिया या होत असतात.

मन ताब्यात असणे किंवा ठेवणे हे खरे तर खूपच जिकिरीचे असते आणि प्रत्येकाला ते साध्य होईलच असे नाही. तरी देखील प्रत्येकाने यासाठी निश्चितच प्रयत्नशील असावे. मनावर ताबा ठेवण्याकरिता अनेक घटकांची मदत घेता येऊ शकते. जसे की, आहार-विहार, चिंतन, मनन, वाचन, ध्यानधारणा, छंद जोपासना आणि संगत आणि याहीपेक्षा हे सर्व करत असताना त्याकरिता आवश्यक असणारी पोषक परिस्थिती.

ही पूर्वपीठिका विषद करण्याचे कारण असे की, आज-कालच्या धकाधकीच्या जीवन प्रणालीमध्ये अमर्याद (अनावश्यक) भौतिक साधने उपलब्ध आहेत आणि चंगळवाद झपाट्याने फोफावत चालला आहे आणि ती साधने प्राप्त करण्याकरिता बहुतेक सर्वांमध्ये अहमहमिका किंवा चढाओढ सुरू असते आणि त्यामधून सुरू होते एक (जीवघेणी, विचित्र) स्पर्धा. जिचा ना आदी ना अंत. त्या स्पर्धेत आपलाच कुणी मागे पडला त्याची ना कुणाला खंत ना खेद. मी आणि माझे, माझे हा विचार बलिष्ठ ठरतोय. त्या हव्यासापोटी त्यासोबत येणारे कर्जाचे ओझे आणि त्या योगे मनाला येणारी विफलता आणि इथे येते ती ढळलेली मनःशांती.

म्हणजेच हा सर्व प्रवास चाललाय समूह प्रियतेकडून आत्मकेंद्रिततेच्या दिशेने आणि हाच तो बिंदू जिथे स्वार्थ विचार आणि त्यासोबतच अहंकार अतिशय बळावतो. येथेच समाजभान, सर्वसमावेशकता सोयीस्करपणे विस्मृतीत जाते. लहानपणी शाळेत शिकत असताना वाचलेले एक वाक्य (व्याख्या) सहज आठवले...

‘मनुष्य हा समूह प्रिय किंवा समाजप्रिय प्राणी आहे.’ आज असा विचार पडतो की, कुठे आहेत ती कुटुंबे आणि तो समाज? (इथे समाज हा शब्द जातींकरता नसून मानवाच्या समूहाकरिता आहे.) या सर्व सांस्कृतिक बदलांचा आढावा घेत असताना कुटुंबपद्धती नामशेष होत चालली आहे. (नव्हे झाली आहे.) या वास्तविकतेवर कुणाचेच फारसे लक्ष असल्याचे दिसून येत नाही. नाही म्हणायला चार-दोन विचारवंत यावर लेख लिहून, आपले अभिमत व्यक्त करतात. झाले. (संपला विषय.) या सर्व पारिस्थितीच्या होणाऱ्या दूरगामी भीषण परिणामांची झळ आता हळूहळू जाणवू लागली आहे. आवश्यकता या गोंडस संकल्पनेच्या नावाखाली वृद्धाश्रम निर्माण झाले आहेत. सेवा भाव दिवसेंदिवस कमी होताना आढळून येतोय. वृद्धांना हवी असलेली आपुलकी, प्रेम, माया, कुटुंबाकडून आवश्यक असणारे वात्सल्य, आत्मीयता यांची प्रचंड कमतरता होत चालली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचे मनोबल हळूहळू खच्ची होत आहे आणि यामुळेच मनोविकाराच्या गर्तेमध्ये असे नागरिक गुरफटले जात आहेत. या सर्व अव्यवस्थेमुळे मनात उठणारे क्लेशकारक आवर्त आणि ढळलेली मन:शांती.

याही स्थितीमध्ये एक जमेची बाजू अशी, काही वृद्धाश्रमातील व्यक्तींना उपरोल्लेखित सुविधा, आपुलकी प्राप्त व्हावी या विचारांनी प्रेरित काही व्यक्ती आणि संस्था देखील या कार्यात अग्रेसर होताना दिसत आहेत, हे निश्चितच एक आनंददायी पाऊलच म्हणावे लागेल. एकूणच या अशा परिस्थितीमध्ये मनःशांती कशी लाभावी आणि कठे शोधावी बरे? ही कुण्या एका घरातली समस्या नसून गल्लोगल्ली आणि घरोघरी दिवसेंदिवस वाढीस लागलेली समस्या आहे. यावर चिंतन होणे अत्यंत गरजेचे असून नुसताच ऊहापोह न करता मार्ग शोधणे अगत्याचे आहे. अन्यथा...???

Comments
Add Comment