अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील फुबगाव येथील एका घराची भिंत कोसळून या मलब्याखाली सात वर्षाच्या चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पासह, नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मंगळवारी सकाळी सहा ते सातच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत घरातील पाचही जण दबले गेले. बचाव पथकाने भिंतीच्या मलब्याखाली दबलेल्या सर्वांना बाहेर काढले. यावेळी आई आणि चिमुकली दबल्याने मृत्युमुखी पडल्या होत्या. हे पाहून गावातील प्रत्येकजण हळहळला.
पायल अरुण वराडे (७) आणि चंदा अरुण वराडे (३५) असे मृत मुलगी व आईचे नाव आहे. याचवेळी नारायणराव वराडे (६० वर्ष), ओम अरुण वराडे (१०), अरुण नारायण वराडे हे जखमी झाले आहेत. तिन्ही जखमींना तात्काळ चांदूरबाजारच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.