मुंबई : मागच्या काही दिवसांपासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रूपयाची मोठी घसरण होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आजवरच्या सर्वात निचांकी पातळीवर घसरले आहे. डॉलरच्या तुलनेत रूपया ८० रूपयांपर्यंत घसरला आहे. ही आजपर्यंतची सर्वांत निचांकी पातळी आहे. या घसरणीमुळे देशातील महागाई वाढण्याची शक्यता आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी ३० अब्ज डॉलरच्या शेअर्सची विक्री केल्यामुळे रूपयाने निचांकी गाठली असल्याची माहिती आहे.
मागच्या सत्रात रूपया ७९.९७ वर बंद झाला होता. त्यानंतर आज तो ७९.९८ वर उघडला आणि लगेच घसरण होत ८०.०५ पर्यंत गेला आहे. त्यामुळे ही मोठी चिंतेची बाब आहे. या घसरणीमुळे परदेशी आयातीचा खर्च वाढणार असून याच्या झळा सामान्य नागरिकांना सहन कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर भारतीय बाजारातून परेदशी गुंतवणुकदार माघार घेत असल्यामुळे चिंता वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि बाजारातून विदेशी भांडवलाचा सतत होणारा ओघ हे रुपयाच्या घसरणीचे कारण असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परदेशी गंगाजळी वाढावी यासाठी अनेक उपायांची घोषणा केली होती. ज्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांना अल्प-मुदतीचे कॉर्पोरेट कर्ज खरेदी करण्याला परवानगी तसेच अधिक सरकारी सिक्युरिटीजचा समावेश याचा समावेश होता.