गोंदिया (हिं.स.) : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७६७ घरे उध्वस्त झाली असून ३९ जनावरे दगावली आहेत.
गोंदिया जिल्हासाठी जुलै महिना नैसर्गिक आपत्तीचा ठरला असून सततच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात १ जून ते १८ जुलै दरम्यान ११ जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यापैकी चौघांचा पुरात वाहून तर ७ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे. यासोबतच जिल्ह्यात घरे, गोठे असे एकूण ७६७ संपत्तींचे नुकसान झाले आहे. तर ३९ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे आता पर्यंत ११ मृतका पैकी ५ मृतक व्यक्तींच्या वारसांना मदत म्हणून २० लाख रुपये देण्यात आले असून ६ प्रकरणे प्रलंबीत आहेत. जिल्हाला नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत ३० लाख २६ हजार रुपये प्राप्त झाले असून त्यात २० लाख रुपये संबंधितांना मदत करण्यात आलेली आहे. लवकरच इतर मृत व्यक्तिना मदत मिळणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत आहे.