Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीराज्यानंतर आता दिल्लीत उलथापालथ!

राज्यानंतर आता दिल्लीत उलथापालथ!

दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवे फासे टाकणार

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दिल्लीत दाखल झाल्याचे समजताच शिवसेना नेत्यांची झोप उडाली असून आज ते कोणते नवे फासे टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करत शिंदे गटाने काल आपली स्वत:ची कार्यकारिणी जाहीर केली. दिल्लीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वकिलांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले. खासदारांबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सोमवारी राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर आणि बुधवारी सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्षावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महत्त्वाचा असल्याचे समजले जात आहे. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी दिल्लीत ओबीसी आरक्षणाच्या बाबत चर्चा करण्यासाठी वकिलांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज होणारी सुनावणी बुधवारी २० जुलै रोजी होणार आहे.

शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधात भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. शिवसेनेचे फक्त १४ नव्हे तर १८ खासदार आपलेच आहेत. सर्वजण येणार असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या खुप चर्चा सुरु आहे पण मला अद्याप काही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. खासदारांसोबत भेट झाल्यानंतर अधिक माहिती देऊ असेही त्यांनी सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत असून सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने निकाल येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १२ खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. या भेटीनंतर या बंडखोर खासदारांचा वेगळा गट लोकसभेत होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, ओबीसी आरक्षण, सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार तूर्तास मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. उर्वरित १२ खासदार आता शिंदे गटामध्ये जाणार आहेत. यासंबंधी लोकसभा अध्यक्षांना आज पत्र दिले जाणार आहे.

लोकसभेत शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे नेमले जाणार तर प्रतोदपदी भावना गवळी कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा अध्यक्षांना आज याबाबतच पत्र सोपवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, दुसरीकडे विनायक राऊत हेच गटनेते आणि राजन विचारे हे अधिकृत प्रतोद असल्याचे सांगत शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -