Friday, January 17, 2025
Homeमहत्वाची बातमीजनकल्याणास तत्पर; हेडगेवार हॉस्पिटल

जनकल्याणास तत्पर; हेडगेवार हॉस्पिटल

शिबानी जोशी

अमरावती शहर आणि आसपास अल्प दरात चांगली वैद्यकीय सेवा पुरवण्याची गरज संघ विचारांच्या लोकांच्या लक्षात येत होती. त्यामुळे २००५ मध्ये स्थापन झालेल्या जनकल्याण सेवा संस्थेने सुरुवातीला काही सामाजिक उपक्रम, वैद्यकीय शिबीर, नेत्र पेढी, रोजगार देणं अशी कामे हाती घेतली होती. अमरावतीतील यशोधन बोधनकर हे वैद्यकीय शिक्षण घेत असताना संघ आणि सेवांकुर या सेवाभावी कामाशी जोडले गेले होते. सेवांकुर ही संस्था मूलतः डॉक्टर्सना एकत्र करून सेवावृती त्यांच्यात रुजवण्याचा प्रयत्न करत असते. डॉ. बोधनकर सेवांकुर निगडित झाल्यामुळे समाजाचे आपण देणे लागतो ही वृत्ती आणि त्यासाठी समाजासाठी आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग करावा, हे विचार त्यांच्या मनात रुजतच होते. दरम्यानच्या काळात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली तसेच मुंबईतल्या टाटा कॅन्सर रुग्णालयातही त्यांना फेलोशिप मिळाली होती. तरीही औरंगाबादच्या डॉ. हेडगेवार रुग्णालयाप्रमाणेच अमरावतीलाही असा प्रकल्प सुरू करून लोकांना अल्प दरात वैद्यकीय सेवा द्यावी, असं त्यानी मनात घेतलं आणि अमरावतीतील काही संघाचे लोक, जनकल्याण संस्थेची मंडळी एकत्र येऊन रुग्णालय सुरू करायचा ठरवलं. त्यासाठी जवळपास दोन वर्षं या सर्वांनी या प्रकल्पावर काम केले. मुधोळकर पेठ भागामध्ये संघाचे विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू यांनी त्यांची स्वतःची जागा उपलब्ध करून दिली. ती घेऊन २ डिसेंबर २०१२ रोजी रुग्णालयाचे काम सुरू केले. डॉक्टर यशोधन बोधनकर, डॉक्टर राहुल हरकुट, डॉक्टर अंजली घिके, डॉ. श्रीनिवास काळे आणि डॉक्टर अमित आचलिया असे पाच संस्थापक सदस्य एकत्र येऊन त्यांनी रुग्णालयात सेवा द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला १३ बेडचं रुग्णालय सुरू झालं. सुरुवातीपासूनच जनरल सर्जरी आणि गायनॅकची ओटी, ओपीडी अशा सुविधा सुरू केल्या. त्यानंतर तीन वर्षांत पॅथालॉजी, एक्स-रे, सोनोग्राफी, अस्थिरोग अशा एकेक सुविधांची त्यात भर पडत गेली. २०१८ मध्ये रुग्णालयाचे विस्तारीकरण होऊन २५ बेडचे सुसज्ज हॉस्पिटल तयार झाले. सध्या रुग्णालयात आठ सुसज्ज विभाग आहेत. सर्जरी, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, बालरोग, दंत व मुखरोग, मेडिसीन, अस्थिरोग, मेंदू व मनोरोग तज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ आणि डोकं, गळा व कॅन्सर तज्ज्ञही उपलब्ध असतात.

२५ तज्ज्ञ डॉक्टर्स त्यांच्या ठरावीक वेळेनुसार उपलब्ध असून २४ तास इमर्जन्सी सेवा उपलब्ध आहे. ओपीडी, आयपीडी, सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, इसीजी, केशव मेडिकल स्टोअर, कार्डयाक ॲम्बुलन्ससह दोन ॲम्बुलन्स अशा सुविधा इथे उपलब्ध आहेत. आज दर महिन्याला अंदाजे अडीच ते तीन हजार रुग्ण इथे विविध सुविधांचा लाभ घेत आहेत. महिन्याकाठी ३० शस्त्रक्रिया होतात, ७० ते १०० रुग्णांवर भरती करून उपचार होतात. खासगी क्षेत्रापेक्षा जवळजवळ निम्म्या दरात इथे वैद्यकीय सेवा पुरवली जात असली तरीही दर्जाच्या बाबतीत कुठलीही तडजोड होत नाही. त्यामुळे केवळ गरीबच नाही, तर सधन वर्गातले लोकही आवर्जून इथे चांगली वैद्यकीय सुविधा घ्यायला येत असतात.

अशा सेवा कोणत्याही मोठ्या रुग्णालयात उपलब्ध असतात; परंतु या रुग्णालयाची काही खास वैशिष्ट्य आहेत जी खासगी रुग्णालयात अभावानं आढळतात. संस्थेच्या वतीने आरोग्यवर्धिनी योजनेमध्ये रुग्णांना उपचार सवलत दिली जाते. गेल्या दहा वर्षांत ७७२ ओपीडी रुग्णांना व ३४२ आयपीडी रुग्णांना उपचार सवलत दिली आहे. दुसरी सवलत योजना धर्मादाय आयुक्त कार्यालयाची इंडिजन्ट पेशंट फंड आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निर्धन रुग्णांवर १०० % निशुल्क तसेच ५० टक्के सवलतीमध्ये उपचार केले जातात. या योजनेत एप्रिल २०१८ पासून २०२२ पर्यंत ११ कोटी rupyel उपचार सवलत दिली आहे.

संस्थेचे आणखी एक स्वप्न आयसीयू युनिट उभारणं हे होतं. ते नुकतंच गेल्या सप्टेंबर महिन्यात पूर्ण झालं आहे. प्रसिद्ध व्यावसायिक नरेंद्र भाराणी यांनी नंदा मार्केट ही त्यांची वडिलोपार्जित इमारत विनामूल्य वापरायला उपलब्ध करून दिली. मुख्य रुग्णालयाच्या थोडसं पुढे राजापेठ परिसरात भाराणी मेमोरियल क्रिटिकल केयर युनिट या नावाने नवे ३२ बीडचे रुग्णालय युनिट साकारले. त्यात पंधरा बेड आयसीयू, इतर १७ बेड आयपीडीसाठी आहेत. डायलिसिस, कार्डियोलोजी, गॅस्ट्रो इंटरोलोजी, श्वसन व दमा विकार, न्युरोसर्जरी, हाय रिस्क सर्जरी, एक्स-रे सोनोग्राफी 2DECHO इत्यादी सुविधा येथे उपलब्ध आहेत. थोड्याच दिवसांत इथे सिटीस्कॅनची आणि एनडॉस्कॉपी सेवा देण्याची ही सुरुवात होणार आहे. येथेही खासगी हॉस्पिटलच्या तुलनेत ३० ते ४० टक्के सवलतीमध्ये उपचार दिले जातात.

मोबाइल डिस्पेंसरी – फिरता दवाखाना सुविधा हे रुग्णालयाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणता येईल. ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा थेट दारी पुरविण्यासाठी फिरता दवाखाना सुविधा आसपासच्या नांदुरा, ब्राह्मणवाडा गोविंदपूर, पिंपळखुटा लहान, बोडणा येथे उपलब्ध करून दिली आहे. गेल्या २ वर्षांपासून हे काम सुरू असून गावात एखादा रुग्ण गंभीर असेल,

तर त्याला अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात आणण्याची सुविधाही आहे. केवळ ३० रुपयांत रुग्णांना तपासून ७ दिवसांचे जेनरिक औषध मोफत दिले जाते. दर महिन्यात सुमारे २०० रुग्ण या सुविधेचा लाभ घेतात. श्रद्धेय एकनाथजी रानडे यांचे टिमटाला हे जन्मगाव आहे. श्री स्वामी विवेकानंदांचे कन्याकुमारीला शिला स्मारक साकारणारे एकनाथजी रानडे यांचे जन्मगाव टिमटाला. त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि स्मृती म्हणून टिमटालासह ११ गावांमध्ये संवेदना आरोग्य सेवा प्रकल्प २०१४ पासून कार्यरत आहे. केवळ ३० रुपयांत रुग्णांना तपासून ७ दिवसांचे जेनरिक औषध मोफत दिले जाते. २०१९ पासून टिमटालामध्ये संवेदना प्रकल्पांतर्गत स्थायी आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे पॅथॉलॉजी सँपल कलेक्शन सेंटर, डे केअर सुविधाही आहेत. वर्षभरात सुमारे २००० रुग्ण या सुविधेचा लाभ घेतात.

शहरात चार सेवावस्तीमध्ये संत गाडगेबाबा यांच्या नावाने आरोग्य सेवा प्रकल्प सुरू केले आहेत. तिथेही केवळ ३० रुपयांत रुग्णांना तपासून ७ दिवसांचे जेनरिक औषध मोफत दिले जाते. दर महिन्यात सुमारे २०० रुग्ण या सुविधेचा लाभ घेतात. शहरी आरोग्य केंद्र श्रीमती लक्ष्मीबाई वाठोडकर स्मृती रुग्ण सेवा सदनमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ अल्प दरात रुग्णचिकित्सा करतात. रुग्ण सेवा सदनमध्ये रुग्ण साहित्य केंद्र अल्प दरात सुरू आहे. दरमहा सुमारे १५० रुग्ण या सुविधेचा लाभ घेतात. तसेच बाहेरगावाहून येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या निवासाची व्यवस्था तेथे आहे. ज्येष्ठ नागरिकांची तसेच अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची आरोग्य सुविधेसाठी होणारी परवड पाहता त्यांच्यासाठी घरपोच आरोग्य तपासणी सुविधा देणारी ‘अक्षयवट योजना’ सुरू केली आहे. या पद्धतीची सेवा देणारे हे अमरावतीमधील एकमेव रुग्णालय असेल, असं म्हणायला हरकत नाही. कोणीही रुग्ण वैद्यकीय उपचाराविना असू नये, समाजातील सर्व सरातील रुग्णांना परवडेल अशी वैद्यकीय सेवा एकाच छताखाली द्यावी, या उद्देशाने रुग्णालयाचा श्रीगणेशा झाला. या सर्व प्रकल्पांसाठी लागणारा निधी सामाजिक सहयोगाने उभारला जातो.

सध्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून अजय श्रॉफ, सचिव म्हणून गोविंद जोग आणि डॉ. यशोधन बोधनकर प्रकल्प संचालक म्हणून काम पाहतात. सेवा, स्वास्थ्य आणि सहयोग ही मूल्ये जनकल्याणच्या कार्याची त्रिसूत्री आहे. दशकपूर्तीकडे जाणाऱ्या संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत ३००+ बेडच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी परिपूर्ण असे अद्ययावत धर्मार्थ रुग्णालय अमरावतीत उभारण्याचा मानस आहे. त्या भव्य स्वप्नाची पायाभरणीही झाली आहे!

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -