Sunday, July 14, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखवाहतूक कोंडीचा विळखा

वाहतूक कोंडीचा विळखा

सध्या संततधार स्वरूपात असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे, वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या, जवळील वाहनांवरून वाढणारी प्रतिष्ठा या भ्रामक समजुतीमुळे वाहन खरेदीची लागलेली स्पर्धा, नेहमीप्रमाणे रस्त्यांची दुरवस्था या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडीला नजीकच्या भविष्यात खतपाणी मिळत जाणार आहे. सार्वजनिक वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावत चालली आहे. स्वमालकीच्या वाहनातून प्रवास करण्याच्या वाढत्या सवयीमुळे सार्वजनिक प्रवासी उपक्रमांच्या व्यवस्था तोट्यात जाऊ लागल्या आहेत, तसेच डबघाईस आल्याने त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. वाहतूक कोंडी ही समस्या केवळ मुंबई शहर, उपनगरापुरतीच सीमित राहिलेली नसून या समस्येचे अस्तित्व राज्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागात तसेच देशातील राज्याराज्यांमध्ये पाहावयास मिळत आहे. वाहन बाळगण्याच्या खोट्या प्रतिष्ठेविषयी जनसामान्यांच्या मानसिकतेत जोपर्यंत बदल होत नाही, तोपर्यंत वाहतूक कोंडीच्या समस्येमध्ये तोडगा निघणे अवघड आहे. पाश्चात्य देशांचे आपण अनुकरण करतो, त्या देशांमध्ये सायकल चालविणे प्रतिष्ठेची बाब मानली जात आहे.

सायकल चालविल्याने शरीराचा व्यायाम होतो, इंधनाची हानी तसेच पर्यावरणाचे नुकसान होत नाही आणि आपल्या देशात मात्र सायकल चालविणे कमीपणाचे लक्षण मानले जात आहे. रस्त्यावर वाढणारी वाहनांची संख्या एकीकडे वाहतूक कोंडीला निमंत्रण देत असताना दुसरीकडे मनमानी पार्किंगदेखील वाहतूक कोंडीला हातभार लावत आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पार्किंगला जागा आता कमी पडू लागली आहे. सोसायटीतील सदनिकांची संख्या व तळमजल्यावर असलेली पार्किंगची जागा हे समीकरण पूर्वी योग्य होते. मोजक्या दुचाकी व नावाला दोन-चार चारचाकी यामुळे सोसायटी आवारात वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध होत असे; परंतु आता एकाच सदनिकेमध्ये दोन दुचाकी व एक चारचाकी आल्यावर सोसायटी आवारात पार्किंगची समस्या निर्माण होणारच. त्यामुळे सोसायटी आवारात जागा कमी पडू लागल्यावर सोसायटीजवळील रस्त्यावर ही वाहने उभी केली जाऊ लागल्याने रस्त्यावरील रहदारीला त्यामुळे अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. अधिकांश गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भाडेकरूंच्या वाहनांना प्रवेश नसल्याने ती वाहनेही रस्त्याचा आधार शोधू लागली. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रस्त्यांकडून होणारी निकृष्ट दर्जाची डागडुजी रस्त्यावरील खड्ड्यांना निमंत्रण देत आहे. मुसळधार पडणारा पाऊस व अवजड, मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणावरील वर्दळही रस्त्यांच्या दुरवस्थेला निमंत्रण देत असते. निकृष्ट दर्जांच्या रस्ते डागडुजीचे कामही दर वर्षीचीच तसेच सर्व ठिकाणांची बोंब आहे. रस्त्यावर डांबरीकरण केले की, काही महिन्यांतच रस्त्यावरील डांबरीकरण संशोधनाचा विषय बनतो. पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्याचा प्रयोग केला असता, अवजड व मालवाहतुकीच्या वाहनांमुळे पेव्हर ब्लॉकची डागडुजी दबलेली पाहावयास मिळते.

सिमेंटचे रस्ते उखडले जातात. कोणत्या कामात भ्रष्टाचार करावा याची नैतिकताच बाळगली जात नसल्याने रस्त्यांची डोकेदुखी आता भारतीयांच्या पाचवीलाच पूजलेली आहे. खराब खड्डेमय रस्ते वाहतूक कोंडीला पर्यायाने अपघाताला निमंत्रण देत असतात.

खराब रस्त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. अनेक माताभगिनींना वैधव्य आले आहे. मात्र खराब रस्त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागत असताना कोणत्याही कंत्राटदारावर आजतागायत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना फासावर चढविण्यात आलेले नाही. पावसामुळे वाहतूक कोंडीला खतपाणी मिळते; परंतु पाऊस नसतानाही वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या वाढत्या संख्येला लगाम घालणे आवश्यक आहे. वाढत्या प्रदूषणाला आणि वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर आता सम-विषम नंबर प्लेट असलेली वाहने दिवसाआड चालवावी लागणार आहेत. इंधनाच्या किमती वाढत असतानाही रस्त्यावर वाढत चाललेल्या वाहनांचा आलेख पाहिल्यावर हा देश खरोखरीच आता गरीब राहिला आहे का? यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येने प्रदूषणाला खतपाणी मिळत चालले आहे. इंधनाचा आणि वेळेचाही अपव्यय वाढत चालला आहे. मनमानी पार्किंग ही समस्यादेखील वाहतूक कोंडीला खतपाणी घालत आहे. एकतर रस्ते दुतर्फा लहान होत चालले आहेत. या रस्त्यांवर दोन्ही बाजूला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे दोन रिक्षा-टॅक्सीदेखील समोरासमोरून जाऊ शकत नाहीत. एखादी दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका तसेच अग्निशमनची वाहनेदेखील त्या परिसरात जाऊ शकत नाहीत. रस्त्यावर उभी असलेली वाहने हटवितानाच एक ते दीड तासांचा अपव्यय होतो, तोपर्यंत मदतीला विलंब होतो. कोणत्याही समस्येवर तोडगा हा निघतोच; परंतु वेळीच तोडगा न निघाल्यास समस्येचा भस्मासुर निर्माण होतो, तोच भस्मासुर जीवनव्यवस्था संपवितो. आज वाहतूक कोंडीच्या समस्येने जनसामान्यांना विळखा घातला आहे. याही समस्येवर अल्पावधीत तोडगा निघू शकतो, पण त्यासाठी मानसिकता व प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. रस्त्यावरील वाहन संख्या नियंत्रणात आणल्याशिवाय वाहतूक कोंडीवर उपाय निघणे अवघड आहे.

गरज असेल तरच वाहन खरेदी करा. प्रतिष्ठेविषयीच्या भ्रामक संकल्पनेपायी वाहन खरेदीची जी चढाओढ निर्माण झालेली आहे, त्यालाही आळा बसणे आवश्यक आहे. वाहनाची खरोखरीच गरज आहे का? वाहन खरेदी केल्यावर पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे का? यावरही कौटुंबिक विचारविनिमय होणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास लोकोपयोगी उपक्रमाला चालना मिळते व आपलाही इंधनाचा खर्च वाचतो. जिथे शक्य आहे तिथेच वाहनांचा वापर होणे आवश्यक आहे. खासगी वाहनांच्या वाढत्या वापराने आपणावर आखाती देशावर अधिकाधिक अवलंबून राहण्याची वेळ आलेली आहे. वाढत्या वाहनांसाठी आपणास इंधनाची आखाती देशांतून खरेदी करावी लागत आहे. प्रत्येकाने निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. ही समस्या सोडविण्यासाठी स्वत:पासूनच सुरुवात केल्यास या समस्येचे लवकरात लवकर निवारण झालेले पाहावयास मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -