पावसाळा सुरू झाला की, आपोआप सर्व प्रमुख रस्त्यांसह छोट्या-मोठ्या रस्त्यांवर अचानक खड्ड्यांचा जन्म होतो आणि सुरू होते खड्डेमय आयुष्याला सुरुवात. सकाळी उठल्यापासून कार्यालय किंवा कामाचे ठिकाण गाठण्यासाठी प्रत्येकाला करावी लागणारी तगमग आणि खडतर प्रवास पाहिला की, आयुष्यच जणू खड्ड्यात गेलंय की काय? असे वाटावे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, नाशिक, पुणे अशा प्रमुख शहारांसह त्यांच्या आसपासच्या भागांमधील रस्ते हे एकतर खड्ड्यांमध्ये गेलेले असतात किंवा रस्त्यांची चाळण झालेली असते. या अशा खड्डेयुक्त रस्त्यांवरचा प्रवास करताना वाहनधारकांसह प्रवाशांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. हा त्रास अलीकडचा नसून, कित्येक वर्षांपासून रस्त्यांवरील खड्डे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटकच बनला आहे जणू. दर वर्षी पावसाळ्यात शहरांतील रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची होणारी दुरवस्था, त्यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, परिणामी, नागरिकांना त्याचा बसणारा फटका आणि काही मिनिटांच्या अंतरासाठी लागणारा एका तासापेक्षाही अधिक वेळ, अशा बिकट परिस्थितीचा सर्वसामान्यांसह सर्वचजण नेहमीच सामना करत असतात. पण यावेळी चित्र जरा वेगळे आणि सकारात्मक दिसले, असे म्हणावे लागेल. कारण राज्यात अडीच वर्षांपासून कार्यरत असलेले महाविकास आघाडीचे त्रिशंकू सरकार हे सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला फुटीचे ग्रहण लागल्यानंतर कोसळले आणि राज्यात शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्या युतीचे सरकार स्थानापन्न झाल्या-झाल्या नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगोलग रस्त्यांवरील खड्डे आणि त्या अानुषंगाने जागोजागी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यांचा निकाल लावण्याचा मनसुबा व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे परिसरात ठिकठिकाणी वाहतुकीचा मोठा खोळंबा होऊ लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही ठाण्यातीलच असल्याने वाहतुकीचे नियोजन करण्याविषयी ठाणे पोलिसांनी आधीच हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार ठाणे शहराचा वाहतुकीचा आराखडा बनवण्यात येणार आहे. त्यादृष्टीने संबंधित विभागांनी चर्चाही सुरू केली आहे. मुंबईसह विशेषत: ठाणेकरांना कायमच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गासह घोडबंदर रस्ता, मुंबई-नाशिक महामार्गावरही सातत्याने वाहतूक कोंडी असते. महामार्गावर कोंडी झाल्यास शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होऊन गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागतात. परिणामी, नागरिकांना इच्छित ठिकाणी जाण्यास उशीर होतो. शहरातून मोठ्या संख्येने अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्यामुळे या वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडत असल्याचे दिसून येते. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडून लोकांचे जीवही गेले आहेत आणि कित्येकजण कायमचे जायबंदीही झाले आहेत. घोडबंदर रस्त्यासह, भिवंडी बायपास, शिळफाटा अशा ठिकाणी खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याने रस्ते खड्डेमुक्त होण्यासाठी नागरिकांनी अनेकदा निदर्शने केली. मात्र परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
यंदाही अशीच परिस्थिती असून शहरामध्ये विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश देऊनही रस्त्यांवरील खड्डे ‘जैसे थे’च असल्याने त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आणि संबंधितांना तसे निर्देशही दिले. ठाणेकर असलेल्या मुख्यमंत्र्यांना रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडी या विषयाचे गांभीर्य ठाऊक असल्याने त्यांनी महामुंबईतील रस्ते हे खड्डे आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचे आदेश दिले. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ आणि ‘एमएसआरडीसी’ यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आणि ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करणार आहे. ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी विविध निर्देश दिले. रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोडींच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. रस्त्यांवरील हे खड्डे वेळेत आणि चांगल्या पद्धतीने कसे बुजवले जातील, याची काळजी घेण्यासाठी खड्ड्यांबाबत वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. कारण खड्ड्यांबाबत वाहतूक पोलिसांना फार चांगली माहिती असते. त्यामुळे खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांकडून माहिती घेण्यात यावी, असे त्यांनी सुचविले आहे. तसेच पोलिसांनीही या यंत्रणाच्या संपर्कात राहून रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अशा खड्डेयुक्त रस्ते व महामार्गांवरील वाहतुकीचे नियमन करणे हे वाहतूक पोलिसांसाठी जिकिरीचे काम असते.
एमएमआर क्षेत्रातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी रस्तेविकास प्रकल्प राबविण्यात यायला हवा. त्यासाठी दीर्घकालीन नियोजन करून त्यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घ्यायला हवा. बायपास, फ्लायओव्हर, अंडरपास, सर्व्हिस रोड अशा सर्व प्रकारच्या नियोजनांसाठी तज्ज्ञांकडून आराखडा तयार करून घ्यायला हवा. त्यासाठी आवश्यक तिथे भूसंपादन आणि स्थानिक मुद्दे विचारात घेऊन जिल्हाधिकारी, संबंधित महापालिका आयुक्तांनीही सहकार्य करायला हवे. एमएमआर क्षेत्रातील मुंबई शहरासह, ठाणे, नवी मुंबई तसेच शिळफाटा, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी अशा उपाययोजना करण्याबाबत प्रयत्न व्हायला हवेत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आता एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन्ही यंत्रणांनी स्वतंत्र अशा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टीम कार्यान्वित करायला हव्यात व या टीम चोवीस तास खड्डे बुजवण्याचे काम करत राहिल्यास चित्र बदललेले दिसेल. रस्ता कोणाचा आहे, याचा विचार न करता रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसे झाले, तर यावेळी लक्षणीय बदल झालेला दिसेल. नाहीतर या खड्ड्यांचे करायचे काय? हा प्रश्न नेहमीसारखाच या वेळीही अनुत्तरीत राहील.
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…