चिपळूण (वार्ताहर) : गेली दोन वर्षे कोरोनाची महामारी असल्यामुळे सर्वच ठिकाणी धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे यावर बंदी होती, त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांना धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेता आला नाही. गेली दोन वर्षे पर्यटकांना धबधब्याचा आनंद फक्त डोळ्यांनी अनुभवता आला. मात्र, यावर्षी पर्यटनस्थळे खुली झाल्याने आणि पावसाने सुद्धा जोर धरल्याने चिपळूण तालुक्यातील पेढे परशुराम येथील येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग लगत असणारा सवतसडा धबधबा ओसंडून वाहत आहे. या धबधब्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सर्व पर्यटक आनंद लुटताना म्हणत आहेत, ‘काय तो धबधबा.. …काय ती झाडी.. काय तो पाण्याचा झोत.. सवतसडा एकदम ओकेमधी!’
चिपळूण तालुक्यातील सवतसडा धबधबा हा प्रसिद्ध असून या ठिकाणी खूप लांबून पर्यटक धबधब्याखाली भिजण्यासाठी येत असतात कॉलेजमधील युवक-युवती मनोसोक्त आनंद लुटण्यासाठी येत असतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सवतसड्यावर शुकशुकाट पसरलेला होता. गेल्यावर्षी मुसळधार पाऊस असूनसुद्धा या धबधब्याचा आनंद पर्यटकांना घेता आला नव्हता. परंतु यावर्षी जुलै महिन्यात पडलेल्या मूसळदार पावसामुळे सवतसडा धबधबा ओसंडून वाहू लागला आणि या ठिकाणी पर्यटकांची रेलचेल सुरू झाली.
राष्ट्रीय मुंबई-गोवा महामार्गालगतच हा धबधबा असल्याने पाऊस सुरू झाल्यानंतर काही दिवस परशुराम घाट बंद होता म्हणून या ठिकाणी जाण्याचा मार्ग सुद्धा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे पर्यटक जात नव्हते परंतु आता परशुराम घाट सकाळी सहा ते संध्याकाळी सातवाजेपर्यंत सुरू केल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागलेली आहे. पर्यटक धबधब्याखाली आनंद घेण्यासाठी मुंबई-पुणे या शहरातून सुद्धा सुट्टीच्या दिवशी येतात. रविवारी या धबधब्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी होताना दिसते. धबधब्यामुळेच रस्त्यावरती काही मका विकणारीA दुकाने सुद्धा लागलेली असून छोट्या विक्रेत्यांचा सुद्धा पोटापाण्याचा प्रश्न या काळात सुटला आहे.
मात्र, धबधब्याकडे जाणारी जी पाखाडी आहे त्या पाखाडीच्या दोन्ही बाजूला जी झाडी वाढलेली आहे ती झाडी कापण्यात आली तर निश्चितच तो रस्ता पर्यटनाला जाण्यासाठी सुरक्षित होऊ शकतो. धबधबा आहे त्या ठिकाणी दगडांचा छोटा ढीग आहे तो जर बाजूला झाला तर या ठिकाणी पर्यटकांना चांगल्याप्रकारे फिरता येऊ शकते. आणि आनंद घेता येईल. मात्र, सध्या या सवतसडा धबधब्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे.