मुंबई (हिं.स.) : ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंह यांचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते. त्यांची पत्नी आणि गायिका मिताली सिंह यांनी याबाबत माहिती दिली. गेले काही ते अनेक शारीरिक व्याधींनी त्रस्त होते. त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भूपिंदर सिंह यांचा जन्म ब्रिटिश राजवटीत पंजाब प्रांतातील पटियाला या संस्थानात ८ एप्रिल १९३९ रोजी झाला. त्यांचे वडील प्रोफेसर नाथा सिंह हे देखील संगीतकार होते. भूपिंदर यांनी १९८० मध्ये बंगाली गायिका मिताली मुखर्जी यांच्यासोबत विवाह केला. या जोडप्याला अपत्य नाही. सुरुवातीला भूपिंदर यांनी आकाशवाणीवर आपला कार्यक्रम सादर केला.
आकाशवाणीवरील त्यांचे कार्यक्रम पाहून त्यांना दूरदर्शन केंद्र, दिल्ली येथे संधी मिळाली. तेथे ते व्हायोलिन आणि गिटारही शिकले. १९६८ मध्ये संगीतकार मदन मोहन यांनी त्यांचा ऑल इंडिया रेडिओवरील कार्यक्रम ऐकल्यानंतर त्यांना दिल्लीहून मुंबईला बोलावले.
त्यांना सर्व प्रथम ‘हकीकत’ चित्रपटात संधी मिळाली, जिथे त्यांनी ‘हो के मजबूर मुझे उसने बुलाया होगा’ ही गझल गायली. त्यानंतर त्यांनी ‘मौसम’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘दूरियां’, ‘होके मजबूर मुझे, उसे बुलाया होगा’, ‘दिल ढूंढता है’, ‘दुकी पे दुकी हो या सत्ते पे सत्ता’ अशी अनेक गाणी गायले आणि ती सर्व गाणी खूप लोकप्रिय झाली. त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी गायलेली गाणी त्यांच्या चाहत्यांच्या मनात नेहमीच त्यांना जिवंत ठेवतील.