Saturday, July 20, 2024
Homeदेशराष्ट्रहितासाठी सभागृहाचा उपयोग करा

राष्ट्रहितासाठी सभागृहाचा उपयोग करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधकांना आवाहन

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना चर्चा करत राष्ट्रहितासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. “हा कालखंड सध्या फार महत्वाचा आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असून आगामी २५ वर्षात जेव्हा शतक साजरं होईल तेव्हा तो प्रवास कसा असावा, किती वेगाने करावा, कोणती नवी उंची गाठावी याचा संकल्प करण्याचा आणि त्यासाठी संसद देशाला दिशा देईल,” असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. देशाला नवी ऊर्जा देण्याचे कारण ठरण्यासाठी हे अधिवेशन महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

देशाचा विकास जलद गतीने होत आहे. सभागृहाचा सकारात्मक वापर होऊन यातून देशाच्या उन्नतीसाठी उपयुक्त काम होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. याशिवाय उत्तम काम होण्यासाठी सगळ्यांकडून सहकार्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी संवाद साधला.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असल्यानेही विशेष महत्व आहे. याच कालखंडात देशाला नवे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती मिळणार असून त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

“आम्ही नेहमीच सभागृहाला संवादाचे एक सक्षम माध्यम, तीर्थक्षेत्र मानत आलो आहोत, जिथे खुल्या मनाने संवाद होण्याची आवश्यकता आहे. गरज पडली तर वाद, टीका झाली पाहिजे. गोष्टींचं विश्लेषण झालं पाहिजे, जेणेकरुन धोरणं आणि निर्णयांमध्ये सकारात्मक योगदान करता येईल. सखोल आणि उत्तम चर्चा झाली पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, सर्वांच्या प्रयत्नाने सभागृह चालतं, उत्तम निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपण सर्वांनी त्याचा राष्ट्रहितासाठी वापर करुयात. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं त्यांच्या स्वप्नांना लक्षात ठेवत सभागृहाचा सर्वाधिक सकारात्मक उपयोग झाला पाहिजे,” असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अनेक मुद्दे चर्चेला येणार आहेत. या अधिवेशनात २४ नवीन विधेयक मांडणार असून यावर चर्चा होणार आहे. मोदींनी अधिवेशनात अनेक विषयांवर उत्तम चर्चा व्हावी अशी सर्व खासदारांना विनंती केली आहे. येथे वादविवाद, माहिती, विश्लेषण यावर बोलणे आणि चर्चा होणे आवश्यक आहे. या विषयांवर चिंतन, चर्चा करण्याची विनंती पंतप्रधानांनी खासदारांना केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -