Tuesday, July 9, 2024
Homeकोकणरायगडताम्हिणीतील धबधबे, निसर्गसौंदर्याची पर्यटकांना भुरळ

ताम्हिणीतील धबधबे, निसर्गसौंदर्याची पर्यटकांना भुरळ

गौसखान पठाण

सुधागड-पाली : माणगाव तालक्यातील पाटणूस, भिरा, विळे, रवाळजे व रायगड जिल्ह्याच्या वेशीवर असलेला पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट येथील फेसाळते धबधबे, अप्रतिम निसर्ग सौंदर्य व जैवविविधता अनेकांना भुरळ घालत आहे. पावसाळ्यात तर येथील निसर्गसौंदर्य म्हणजे स्वर्गाची अनुभूती असते. म्हणूनच सध्या येथे असंख्य पर्यटक व निसर्गप्रेमींची अलोट गर्दी होत आहे.

फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतभरातून हा निसर्गाचा अमूल्य ठेवा पाहण्यासाठी व प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पर्यटक व अभ्यासक येतात. या संपूर्ण परिसरात निसर्गाचा अमूल्य ठेवा दडला आहे. देवकुंड, खजिना ट्रॅक, व्हाइट वॉटर रिव्हर राफ्टिंग या उल्लेखनीय गोष्टींसह गिधाड, बिबटे व राज्य प्राणी शेकरू या दुर्मीळ प्राण्याचे निवास्थान देखील येथे आहे. हा दुर्मीळ, नैसर्गिक व ऐतिहासिक ठेवा असलेल्या परिसर जगाच्या पाठीवर आता सगळ्यांना समजू लागलेला आहे. परिणामी येथे आता बाराही महिने पर्यटन वाढीस लागले आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

पुणे व मुंबई या शहरातून कोकणात व रायगडमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. यातील बहुसंख्य पर्यटक व निसर्गप्रेमींची पावले भिरा, पाटणूस, विळे, ताम्हिणी आदी परिसराच्या आसपास वसलेला ऐतिहासिक आणि निसर्गाचा अमूल्य व अचंबित करणाऱ्या या ठेव्याकडे वळत आहेत.

ऐतिहासिक महत्त्व

दुसऱ्या महायुद्धातील पराक्रमाबद्दल व्हिक्टोरिया क्रॉसने गौरविलेले वीर यशवंत घाडगे यांच्या पत्नी दिवंगत लक्ष्मी घाडगे यांचे माहेर पाटणूस आहे. तसेच पहिल्या महायुद्धात पराक्रम दाखवून धारातीर्थी पडलेल्या येथील ४५ सैनिकांसाठी ब्रिटिशांनी पाटणूस येथे स्मृतिस्तंभ उभारला आहे.

पर्यटकांसाठी सोयीसुविधा

पाटणूस व विळे-भागाड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या भागाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध गोष्टी केल्या जात आहेत. पाटणूस, विळे व म्हसेवाडी येथे दोन चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. पर्यटकांना बसण्यासाठी पाटणूस परिसरात बाके बसविण्यात आली आहेत. पर्यटकांकडून प्लास्टिक कचरा टाकू नये तसेच खबरदारीच्या सूचना देणारे दर्शनी फलक बसविले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -