रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी समुद्राला उधाण आल्याने उंच लाटा किनाऱ्यावर धडकत आहे. या लाटांचा तडाखा बसून मिऱ्या बंधारा पुन्हा ढासळू लागला आहे. जाकिमिऱ्या नजीकच्या उपळेकर बाग परिसरातील बंधारा पुन्हा वाहून गेला आहे. त्यामुळे या भागात पुन्हा समुद्राच्या लाटांचे पाणी थेट मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमावस्येदरम्यान समुद्राला उधाणाची भरती येते. पुढच्या आठवड्यात अमावस्या आहे. यामध्ये अमावस्येपूर्वी येणाऱ्या उधाणामुळे किनाऱ्यावरील घरांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जाकिमिऱ्या-भाटिमिऱ्या किनाऱ्यावर बंधारा उभारण्यासाठी तब्बल १६९ कोटी रु.च्या कामाचे भूमिपूजन झाले असले तरी प्रत्यक्षात जुन्या पद्धतीनेच किनाऱ्यावर दगड टाकण्याचे काम सुरू असल्याने या पावसाळ्यात मिऱ्यावसीयांचा धोका कायम आहे.
कोकणातील चारही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाल असला तरी १९ जुलैपर्यंत मुसळधार पावसासह समुद्राला उधाण येण्याचा इशारा देण्यात आला आहे. उधाणाच्या वेळी समुद्राचा लाटा मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर आदळतात. यावेळी लाटा किनाऱ्यावर आदळून पुन्हा समुद्रात जाताना किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे दगड आपल्यासोबत घेऊन जातात. त्यामुळे किनाऱ्यावरील बंधाऱ्याला अनेक ठिकाणी भगदाड पडते. सध्या जाकिमिऱ्या नजीकच्या उपळेकर बाग येथील बंधारा वाहून जाऊ लागला आहे. लाटांचा वेग वाढल्यास येत्या दोन-चार दिवसात बंधाऱ्याला मोठे भगदाड पडण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तवली आहे.
पंधरामाड – जाकिमिऱ्या – भाटिमिऱ्या संरक्षक बंधाऱ्यासाठी सुमारे १६९ कोटी रु. मंजूर करण्यात आले आहेत. तत्कालीन सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पंधरामाडच्या बाजूने टेट्रापॉइंट तयार करून टाकण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र प्रत्यक्षात बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही, तर किनाऱ्यावर इतर ठिकाणी पूर्वीप्रमाणे काळे दगड टाकण्याचे काम पावसापूर्वी हाती घेण्यात आले होते. मात्र जून महिन्यात उपळेकर बाग येथे टाकलेले दगड दोन दिवसांत समुद्राला आलेल्या उधाणामुळे वाहून गेले आहे. त्यामुळे बंधाऱ्याला भगदाड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समुद्रात उंच लाटा उसळत असून सध्याच्या बंधाऱ्यावरून पाणी मानवी वस्तीत येत आहे. शनिवारी पाऊस नसतानाही किनाऱ्यावर उंच लाटा उसळत होत्या. त्यामुळे किनारी भागातील नागरिक भयभीत झाले आहे. गेले अनेक वर्षे मिऱ्यावासीय संरक्षक बंधाऱ्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र पावसाळा सुरू झाला तरी बंधाऱ्याच्या मुख्य कामाला सुरुवात न झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.