खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचे यावर्षी पावसाळ्यात पितळ उघडे पडत चालले असून मोठमोठे अपघात होतील, अशी धक्कादायक परिस्थिती सध्या निर्माण होत आहे. खेड तालुक्यातील असगणी फाटा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाचा काही भाग धोकादायक पद्धतीने खचला असून या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती वाहनचालक व्यक्त करत आहेत.
खेड तालुक्यातील खवटी ते परशुराम या भागात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम संबंधित ठेकेदाराने निकृष्ट केल्याचा आरोप सातत्याने होत आहे. या भागात सिमेंट काँक्रिटचे बनवलेले नवीन चौपदरी रस्ते अनेक ठिकाणी भेगा गेल्याने धोकादायक बनले आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा गेल्या असून भरावाचा रस्ता खचू लागला आहे. परिणामी आगामी कालावधीत या भागात मोठमोठे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
तालुक्यातील दाभिळ नाका ते दाभिळ शाळा या भागात रस्ता भराव करून उंच करण्यात आला असून असगणी, अंजनी गावाकडे जाण्यासाठी अंडरपास रस्ता व चौपदरी महामार्गासाठी उड्डाणपूल येथे बांधण्यात येत आहे. ठेकेदार कंपनीने पावसाळ्यापूर्वी घाइघाईत येथे पूल व दोन पदरी सिमेंट रस्ता तयार करून वाहतुकीस खुलाही केला. परंतु, या भागातील काम दर्जाहीन झाले असल्याचे काही दिवसांतच या पुलावरच सिमेंट रस्ता खचल्याने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची भीती असून वाहनचालक जीव मुठीत घेऊन येथून मार्गक्रमण करत आहेत.
मुंबई-गोवा चौपदरी महामार्गालगत खेडमध्ये अनेक भागात बाजुपट्टीचे कामचं अनेक ठिकाणी मजबूत नसल्याने रस्त्याच्या बाजूला वाहने चिखलात रुतून चिखल महामार्गावर येत आहे. मुसळधार पावसात चिखलामुळे वाहने घसरण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच आता सिमेंट रस्त्यावर सर्वच ठिकाणी भेगा गेल्याने अपघाताची टांगती तलवार कायम आहे. या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने तातडीने पाहण्याची व उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.