Monday, October 27, 2025
Happy Diwali

भाज्या महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले

भाज्या महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले

नाशिक (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याने शंभरी व त्यापुढील दर गाठले आहे. शहरासह जिल्ह्यात सलग आठवडाभर पाऊस झाल्याने भाज्यांचे दर कडाडले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी संतत धारेमुळे शेतात पाणी साचले. त्यामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला काढणेही कठीण झाले आहे. परिणामी, शहरातील बाजार समिती तथा भाजीबाजारात भाजीपाल्याची आवक घटून भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली असून, याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे.

मेथीची भाजी ४० रु. जुडी, तर गावठी कोथिंबीरची जुडी ८० रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर कारले, दोडके, गिलके, बीट, बारीक वांगे या भाज्यांचे दर शंभरीपार गेले आहेत. गाजर, शिमला बारीक मिरची ८० रुपये किलो, गावठी कोथिंबीर ८० रुपये जुडी, असा दर सर्वसाधारणरीत्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पडत आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतमालाची आवक प्रभावित झाली असून, सामान्य परिस्थितीच्या तुलनेत अवघी ५० ते ६० टक्के आवक सध्या सुरू असल्याने सध्या भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत, त्यांचे दरही जास्त असल्याचे चित्र आहे.

शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असतो. तेथून विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करत किरकोळ बाजारात विक्री केली जाते. नियमित आवकच्या सुमारे ५० ते ६० टक्केच आवक सध्या होत आहे. त्यामुळे कोणत्याही भाजीचे दर २० किंवा ३० रुपये पावशेरपासून सुरू होऊन १२० ते १६० रुपये किलोपर्यंत जात आहेत. दरम्यान बाजारात भेंडी, शिमला, गिलके, दोडके, बटाटे, वांगी अशा नेहमीच्या भाज्या दिसत असल्याने कामावर दुपारच्या जेवणासाठी काय घेवून जायचे जाणार आणि मुलांच्या डब्यात काय द्यायचे, असा प्रश्न गृहिणींना सतावत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >