बिहार, सिवान : बिहारमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. इथे बाबा महेंद्रनाथ शिव मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी जलाभिषेकादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इथे श्रावणाला सुरुवात झाली असून आज पहिल्या सोमवारी ही भीषण घटना घडली. या अपघातात आणखी काही भाविक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये मुफसिल पोलीस ठाण्याच्या भंतापोखर येथील सोहगमती देवी आणि लीलावती देवी या महिलेचा समावेश आहे.
या घटनेनंतर मंदिराचा बंदोबस्त सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.