Tuesday, January 21, 2025
Homeमहत्वाची बातमीरामदास कदमांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

रामदास कदमांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांनी अखेर आपल्या नेतेपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रामदास कदम नाराज असल्याची चर्चा होती. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे शिंदे गटात उघडपणे सहभागी झाले. त्यानंतर आता रामदास कदम यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

रामदास कदम यांनी राजीनामा मातोश्रीवर पाठवला. या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर शिवसेनेत नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळाले.

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम आपल्याकडून कधीच झाले नाही. उलटपक्षी मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

तसेच विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीत बोलावून घेतले आणि मला आदेश दिलेत की, यापुढे तुमच्यावरती कुणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले, मातोश्रीवर कुणी काही बोलले तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचे कारण मला आजपर्यंत कळू शकले नाही. मागील ३ वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे असंही रामदास कदम म्हणाले.

दरम्यान, २०१९ मध्ये आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष केला. हिंदुत्व टिकवले. राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती करू नका. ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल अशी आपल्याला विनंती केली. पण आपण त्याही वेळी माझे ऐकले नाही याचेही दु:ख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेनाप्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी आज शिवसेना नेता या पदाचा राजीनामा देत आहे, असे रामदास कदम यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -