चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील गणेश मित्र मंडळ नारदखेरकी जाधववाडी स्थानिक मुंबई व महिला मंडळ यांच्यावतीने दोन एकर क्षेत्रामध्ये सामूहिक भात शेतीची लावणी नुकतीच करण्यात आली. जाधववाडी येथे ही भातशेतीची लावणी करण्यासाठी ४० माणसे राबत होती. या सामूहिक भातशेतीमधून गणेश मित्र मंडळ जाधववाडी सामाजिक शेतीचा एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
तालुक्यातील नारदखेरकी जाधववाडी येथे सामूहिक भातलावणीचा कार्यक्रम पार पडला. सध्या गावोगावी शेती करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. काही गावातून शेती न केल्याने भातशेतीचे क्षेत्र ओसाड दिसून येते. मात्र, अशा वेळीही नारदखेरकी जाधववाडी येथे सामूहिक शेत लावणी करून या मंडळाने शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही हे दाखवून दिले आहे. शेतकरी हाच जगाचा पोशिंदा आहे. या भातशेती लावणी करताना ४० माणसे व नांगर राबत होते.
हे दृश्य अतिशय आनंददायी होते. यावेळी शेतीची लावणी करताना पारंपरिक गाणी म्हणत जी शेतकरी लावणी करत असे, तशी गाणी म्हणत लावणी करण्यात आली. त्यामुळे वातावरण अगदी उत्साही झाले होते. या सामूहिक भात शेतीतुन सुमारे पाच खंडीपर्यंत उत्पन्न मंडळाला मिळते. शेतीमधून मिळणारे भाताचे उत्पन्न मंडळाच्यावतीने गणेश जयंती कार्यक्रमात जेवणासाठी तांदूळ म्हणून वापरले जाते. सार्वजनिक कार्यक्रमात या धान्याचा वापर केला जातो. येणाऱ्या भाविकांसाठी भोजनासाठी लागणारे जे तांदूळ आहेत ते याच भात पिकातून तयार केले जातात. त्यानंतर उर्वरित भात जे आहे ते विकून जी रक्कम मिळते त्यातून मंडळ सामाजिक उपक्रम राबवत आहे. गणेश मित्रमंडळ नारदखेरकी जाधववाडी स्थानिक, मुंबई महिला मंडळ यांच्यावतीने अशाप्रकारे सामूहिक शेती करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक वेगळा प्रयत्न करीत आहेत.
दोन एकर भात शेती लावण्यासाठी या मंडळांनी दोन ते तीन दिवस अथक प्रयत्न केले आहेत. या सामूहिक शेतीमध्ये महिलांचा सहभागसुद्धा मोठ्या प्रमाणात होता. प्रत्येकाने आपले योगदान देत या सामूहिक भात लावणीत सहभाग नोंदवला होता. दोन एकर क्षेत्रात भात लावणी करताना स्थानिक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, सचिव रमेश खैर, खजिनदार संजय जाधव, मुंबई मंडळाचे पदाधिकारी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.