Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

निलेश राणे आणि नितेश राणे यांची ट्वीटवरून शिवसेनेच्या नेत्यांवर टीका

निलेश राणे आणि नितेश राणे यांची ट्वीटवरून शिवसेनेच्या नेत्यांवर टीका

मुंबई (प्रतिनिधी) : उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांच्या उमेदवारीची घोषणा विरोधकांनी रविवारी केली. उपराष्ट्रपतीपदाचे ‘रालोआ’चे उमेदवार म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनखड यांच्या नावाची भाजपने शनिवारी घोषणा केली होती. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित असल्याच्या मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी ट्वीटवरून शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे.


शरद पवार यांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवरून विरोधी पक्षांच्या बैठकीचे काही फोटो पोस्ट केले. या फोटोंपैकी एका फोटोत सर्व नेते पवारांच्या घरामधील हॉलमध्ये बसल्याचे दिसत असून त्यामध्ये संजय राऊत यांचाही समावेश आहे. आज बिगरभाजप पक्षांबरोबरच इतर गटांशी आमची चर्चा झाली. देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आम्ही मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला, अशा कॅप्शनसहीत पवारांनी हा फोटो ट्वीट केला आहे.


मात्र त्यानंतर हाच फोटो ट्वीट करत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीटरवरून संजय राऊत या बैठकीला उपस्थित कसे? असा प्रश्न विचारला आहे. नितेश यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, “त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवाराला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. मग संजय राऊत विरोधकांच्या बैठकीला काय करत आहेत?” असा प्रश्न नितेश राणे यांनी ट्वीटरवरून पवारांनी शेअर केलेला फोटो पोस्ट करत विचारला आहे.


सामना गमावल्यानंतर पराभूत संघाची ड्रेसिंग रुम अशी कॅप्शन देत विरोधी पक्षांच्या बैठकीतील हा फोटो माजी खासदार आणि महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शेअर केला आहे.

Comments
Add Comment