डोंबिवली (वार्ताहर) : व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी डोंबिवलीकरास मारझोड केल्यानंतर आठवडाभर घरात डांबून ठेवणाऱ्या माटुंग्याच्या खंडणीबहाद्दराला टिळकनगर पोलिसांनी डोंबिवलीतील एका हॉटेलातून नाट्यमयरित्या बेड्या ठोकल्या. सुटकेसाठी त्याच्या पत्नीकडे रेल्वेत नोकरी करणाऱ्या या खंडणीबहाद्दराने ५ लाखांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना हा अपहरणकर्ता खंडणीबहाद्दर पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात अलगद सापडला.
अजय पाडुरंग जाधव (५२) असे अटक करण्यात आलेल्या खंडणीबहाद्दराचे नाव असून रविवारी कल्याणला सुट्टीच्या कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता २० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात ऋचा व्यापारी (५५) या महिलेने शनिवारी पोलीस ठाण्यात जाऊन पती अतुल अनंत व्यापारी (५६) यांना ९ जुलै रोजी मुंबईत राहणाऱ्या अजय जाधव याने मारहाण केली. त्यानंतर आपल्या पतीचे अपहरण करून त्यांना माटुंग्यातील एका बंदिस्त खोलीत डांबून ठेवले. पतीची सुटका करायची असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंद केला.
अपहरणकर्ता अजय जाधव याने फोनवरून केलेल्या संभाषणानुसार ऋचा व्यापारी यांना ५ लाख रुपये घेऊन येण्यास एका हॉटेलात बोलावले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वपोनि अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग पिठे यांच्या नेतृत्वाखाली अपहरणकर्त्या खंडणीबहाद्दराला रंगेहाथ पकडण्यासाठी डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडला असलेल्या एका हॉटेलात सापळा लावला. तेथे ५ लाखांची रोकड दिल्यानंतर अजय जाधव याने त्याच्या ताब्यातील अतुल व्यापारी यांची सुटका केली. मात्र पोलिसांनी ऋचा व्यापारी यांच्याकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना अजय जाधव याला रंगेहाथ पकडले.