नवी दिल्ली : केंद्र सरकारने मध्यस्थी केल्यानंतर खाद्यतेलाचे दर कमी होत आहेत. गेल्या काही दिवसांत तेल कंपन्यांकडून दर कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. खाद्यतेलाच्या किमतींवर चर्चा करण्यासाठी खाद्य मंत्रालयाने ६ जुलै रोजी बैठक बोलावली होती. यादरम्यान, सर्व खाद्य तेल कंपन्यांना जागतिक स्तरावर दरात झालेल्या घसरणीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले होते.
खाद्यतेल कंपनी अदानी विल्मरने खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर ३० रुपयांनी कपात केली आहे. फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत उत्पादने विकणाऱ्या या कंपनीने जागतिक स्तरावर तेलाच्या किंमत घट झाल्याने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन किंमतीसह माल लवकरच बाजारात पोहोचेल. तत्पूर्वी धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि भात कोंड्याच्या तेलाच्या किमतीत १४ रुपयांनी कपात केली होती.
फॉर्च्युन सोयाबीन तेलाची किंमत १९५ रुपये प्रति लिटरवरून १६५ रुपये प्रति लीटर झाली आहे. सूर्यफूल तेलाची किंमत २१० रुपये प्रति लीटरवरून १९९ रुपये प्रति लीटर झाली आहे. मोहरीच्या तेलाची कमाल किरकोळ किंमत १९५ रुपये प्रति लिटरवरून १९० रुपये प्रति लीटर इतकी कमी करण्यात आली आहे. तसेच, फॉर्च्युन राईस ब्रान ऑइलची किंमत २२५ रुपये प्रति लीटरवरून २१० रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे.