Friday, July 11, 2025

पंढरपुरात वारकऱ्यांना बासुंदीतून विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर

पंढरपुरात वारकऱ्यांना बासुंदीतून विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर

पंढरपूर : पंढरपूरमध्ये जेवणातून वारकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी जेवणामध्ये बासुंदी, पत्ता कोबी, बेसन आणि चपातीचा आस्वाद घेतल्यानंतर संध्याकाळी वारकऱ्यांना उलटी, पोटदुखी, जुलाब असा त्रास होऊ लागला. त्यामुळे जवळपास ३० ते ३२ जणांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील १० ते १५ जणांना रात्री अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी अरविंद गिराम यांनी दिली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील श्री विठ्ठल आश्रम ६५ एकर जवळील मठामध्ये दुपारी जेवण झाल्यावर अचानक वारकऱ्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना ताबोडतोब उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. जेवणात बासुंदी, पत्ताकोबी, बेसन, खाल्ल्याचे रूग्णांकडून सांगण्यात आले. रुग्णांमध्ये बालकांसह ३० ते ३५ वयोगटातील वारकऱ्यांचा समावेश आहे.


विषबाधा झालेले सर्वजण श्री विठ्ठल आश्रम येथे संप्रदायक शिक्षण घेत आहेत. हे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यामध्ये प्रदीप विठ्ठल शिरोळे, सुदर्शन सगळे, ओंकार निर्मले, प्रणव शिंदे, पवन सुलतानी, दर्शन जाधव, गोरख जयभद्र, विनायक नाडे, वैभव कुंभार, आदिनाथ मालकर, केशव पवार, अभिजीत शिंदे, लक्ष्मण फुके, ऋषिकेश कोल्हे, नितीन गव्हाड, ऋषिकेश तांबे, अर्जुन पवार, गणेश राहणे, प्रताप गीते, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक मोरे, करण परदेशी, स्वागत गाजरे, हरिशचंद्र लोखंडे, अतुल सुरवसे, वैभव शेटे, माऊली गवाड यांचा समावश आहे.


दरम्यान, हे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यातील असून पळसगाव, निमगाव, हळेगाव, वैजापूर, तळोशी, ढाणगाव दौंड, परभणी, कोल्हापूर , शेळवे पंढरपूर, पाटणे, जालना, सिंदखेड, सावरखेड, नाशिक, ढवळगाव, कोपरगाव, जालना, पैठण, दौंड या ठिकाणचे मूळ रहिवासी आहेत.

Comments
Add Comment