
रत्नागिरी (वार्ताहर) : सततच्या पावसामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात रविवारी पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे घाटरस्ता तब्बल पाच तास बंद होता. यामुळे काही काळ कोल्हापूर, पुण्याकडे जाणारी वाहतूक खंडित झाली होती. प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केल्यावर हा घाट पुन्हा सुरू करण्यात आला, तर या वर्षी सलग दुसऱ्यांदा अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने पुन्हा एकदा घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने घाटातील दरडींच्या सुरक्षिततेबाबत प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटामध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा ओणी पाचल अणुस्कुरा मार्गावर घाटात दरड कोसळून रत्नागिरी जिल्ह्यातून कोल्हापूर आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यामध्ये पुण्यावरून येणारी पुणे राजापूर ही एसटी तसेच अनेक अवजड वाहने सकाळी पाच वाजल्यापासून घाटात अडकून पडली होती, तर रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दोन्ही बाजूकडून दुचाकी, चारचाकी वाहनांचे प्रमाणे जास्त होते. मात्र काही प्रमाणात दुचाकीचा मार्ग सुरू असल्याने दुचाकीस्वारांना ये-जा करता येत होती. मात्र अन्य वाहतूक ठप्प होती.
घाटात दरड कोसळल्याचे कळताच तत्काळ स्थानिक पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तत्काळ वाहतूक सुरू करण्यासाठी घाटात कोसळलेली दरड, दगड आणि माती बाजूला करून प्रारंभी एकेरी आणि त्यानंतर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू केली. पाच तासांनी या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.