रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील विमानतळाच्या वाढीव कामासाठी लागणाऱ्या भूसंपादनापोटी गुंठ्याला सुमारे पावणेदोन लाखांचा दर मिळण्याचे संकेत आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांचे विमान उड्डाणाचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्गमधील विमानतळ पूर्णत्वास गेल्यानंतर रत्नागिरी येथीलही विमानतळाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी शासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू केला होता. आता रत्नागिरी येथील विमानतळाचा प्रश्न शासकीय स्तरावरून मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत़
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरी तालुका व संगमेश्वर खाडीपट्ट्यालाही याचा फटका बसला आहे. तालुक्यातील परिस्थितीचा आढावा सामंत यांनी शुक्रवारी घेतला. यावेळी विमानतळाच्या अतिरिक्त जागेसाठीच्या भूसंपादनाच्या स्थितीबाबतही चर्चा झाली. यात विमानतळासाठी गुंठ्याला ४७ हजारांचा रेडीरेकनर दर निश्चित केला जाणार आहे. त्याच्या चारपट म्हणजे सुमारे पावणेदोन लाख रुपये गुंठ्यामागे मोबदला दिला जाण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी केली जात असल्याचे आ.सामंत यांनी स्पष्ट केले.
याचवेळी इंजिनिअरींग कॉलेजची निविदा, छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय उभारणीची सद्यस्थिती, तारांगणाचे काम सात ते आठ दिवसात पूर्णत्वाला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नगर परिषदेच्या नवीन नळपाणी योजनेद्वारे बारा हजार कनेक्शन दिली जाणार असून त्यातील सहा हजार कनेक्शन दिली गेली आहेत. उर्वरीत कनेक्शनला मीटरही मोफत दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात पावसाळ्यात २९ घरांचे सुमारे १४ लाख ९५ हजारांचे नुकसान झाले तर चार गोठ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात ६८ हजार हेक्टरवर भातपीक असून त्यातील ५६ हजार हेक्टरवर भातपिकाची लावणी पूर्ण झाली असून त्यांनी समाधान व्यक्त केले.
आढावा बैठकीसाठी रत्नागिरीत आलेल्या आ. सामंत यांना भेटण्यासाठी शहरातील शिवसेना पदाधिकारी व माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्रामगृहावर आ.सामंत यांचे जोरदार स्वागत करुन, त्यांना पाठिंबा दर्शविण्यात आला.