चिपळूण (वार्ताहर) : यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोकण रेल्वे मार्गावर रोह्याच्या पुढे प्रथमच धावणाऱ्या मेमू ट्रेनला अतिरिक्त चार डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे.
आधी ही गाडी आठ डब्यांची जाहीर करण्यात आली होती. १९ ते २१ ऑगस्ट, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर व १० ते १२ सप्टेंबर २०२२ या दिवशी रोहा- चिपळूण मेमू विशेष गाडी सोडली जाणार आहे. गणेशोत्सवासाठी रोहा-चिपळूण मेमू गाडी आधीच्या दिवा-रोहा गाडीला विस्तारित करुन चालवली जाणार आहे. यामुळे प्रत्यक्षात ही दिवा- रोहा-चिपळूण अशी धावणार आहे. या नुसार ०१३४७ दिवा -रोहा- मेमू सकाळी ८. ४५ ला सुटून सकाळी ११ ला रोहा येथे पोहोचेल. तीच गाडी पुढे ०११५७ रोहा- चिपळूण मेमू म्हणून सकाळी ११.०५ ला सुटून चिपळूणला दुपारी १.२० ला पोहोचेल.
०११५८/०११३४८ चिपळूण -रोहा -दिवा मेमू दुपारी १.४५ ला सुटून संध्याकाळी ४.१० ला रोहयाला पोहोचेल. तीच पुढे०१३४८ रोहा दिवा मेमू म्हणून रोहा येथून ४.१५ ला सुटेल व दिव्याला संध्याकाळी ६.४५ ला पोहोचेल.
दिवा – चिपळूण मार्गावर धावताना मेमू विशेष रेल्वे गाडी दातिवली, निळजे, तळोजे, नावडे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, खेड या स्थानकांवर थांबे घेणार आहे.