Saturday, May 10, 2025

अग्रलेखसंपादकीयरविवार विशेषमहत्वाची बातमी

राष्ट्रपती भवनाच्या वाटेवर …

राष्ट्रपती भवनाच्या वाटेवर …

सुकृत खांडेकर


येत्या २५ जुलै रोजी देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी २९ जून ही नामांकन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याची शेवटची तारीख होती. भाजपप्रणीत एनडीएच्या वतीने द्रौपदी मुर्मू यांनी, तर विरोधी पक्षांच्या वतीने यशवंत सिन्हा यांच्यात ही लढत होणार आहे.


द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या राज्यपाल होत्या, तर यशवंत सिन्हा हे मूळचे भाजपचे, ते एनडीए सरकारमध्ये केंद्रात मंत्री होते. नवे राष्ट्रपती म्हणून एनडीएकडून तीन महिलांच्या नावाचा विचार चालू होता. त्यात द्रौपदी मुर्मू यांच्याबरोबर छत्तीसगढच्या राज्यपाल अनुसूया उइके आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या नावाचा समावेश होता. द्रौपदी मुर्मू या ओरिसामधील आदिवासी नेत्या आहेत. झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले आहे. ओरिसामधील रायरंगपूर मतदारसंघातून त्या विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या पहिल्या ओरिसाच्या नेत्या आहेत की, त्यांची राज्यपालपदावर नियुक्ती झाली.


ओरिसात भाजप-बीजू जनता दल यांच्या युतीचे सरकार असताना त्या २००२ ते २००४ या काळात सरकारमध्ये मंत्रीही होत्या. लोकसभेतील ५४३ जागांपैकी ४७ जागा या अनुसूचित जमाती (एसटी)साठी राखीव आहेत. साठहून अधिक लोकसभा मतदारसंघात आदिवासी समाजाचा प्रभाव आहे. मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, राजस्थान, छत्तीसगढ राज्यांत आदिवासी मतदार निर्णायक ठरू शकतात. द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची चर्चा गेले तीन आठवडे देशात सर्वत्र चालू आहे. एका आदिवासी महिलेला केंद्रातील सत्तेवर असलेला भाजप देशातील सर्वोच्च पदावर बसवत आहे, हीच भावना जनतेत दिसून येते.


अर्थात त्याचा लाभ येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत निश्चितच या पक्षाला मिळू शकतो. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यात येत्या एक ते दीड वर्षांच्या कालावधीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिलेची राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड करताना भाजपने जो चाणाक्षपणा दाखवला त्याची कोणी कल्पना करू शकले नाही. एक महिला आणि तीही आदिवासी तसेच प्रभावशाली अशी मोठी गुणवत्ता द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीमागे आहे. त्यामुळे विरोधी पक्षालाही भाजपने संभ्रमात टाकले. द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला उघड विरोध करण्याचे धाडस कोणत्याही विरोधी पक्षात नाही, तेवढी हिंमतही कोणत्याही राजकीय पक्षात नाही. एनडीएच्या विरोधात राष्ट्रपतीपदासाठी सर्व विरोधी पक्षांच्या वतीने एकच उमेदवार असावा, असे प्रयत्न बरेच झाले. स्वत: शरद पवार, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. पण सर्वानुमते एक उमेदवार शोधताना सर्वांची महिनाभर कशी दमछाक झाली, हे सर्व देशातील जनतेने पाहिले आहे.


चौसष्ट वर्षांच्या द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओरिसातील मयूरभंज जिल्ह्यात झाला. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक शिक्षिका म्हणून केली. १९९७ मध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या. तसेच एकदा त्या मंत्रीही होत्या. दि. ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ या काळात त्या वाणिज्य व परिवहन राज्यमंत्री होत्या. नंतर २००२ ते १६ मे २००४ या काळात मस्यपालन व पशुसंवर्धन विकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. सन २००७ मध्ये ओरिसामधील सर्वश्रेष्ठ आमदार म्हणून त्यांना नीलकंठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. द्रौपदी मुर्मू या ओरिसातील पहिला महिला नेत्या आहेत की, त्यांची राज्यपालपदावर नियुक्ती झाली. आता त्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत.


यशवंत सिन्हा हे एकेकाळी भाजपमधील ताकदवान नेते म्हणून ओळखले जायचे. नंतर ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षाकडून त्यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे आले. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महिला, आदिवासी, दलित व दक्षिण भारतातील वेगवेगळ्या दिग्गज नावांची एनडीएमध्ये चर्चा होती. त्यात द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएचे उमेदवार म्हणून बाजी मारली. भाजपप्रणीत एनडीएची उमेदवारी मिळणे हेच मोठे यश आहे. भाजपचा उमेदवार म्हणून विजयाची पक्की खात्री असते. कारण तेवढे संख्याबळ भाजपकडे आहे.


द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित आहे. देशाच्या राष्ट्रपती होण्याचे भाग्य त्यांच्या नशिबात आहे. २२ जूनला त्या ओरिसातील मयुरभंज जिल्ह्यातील माहूलडिहा गावी त्यांच्या घरी होत्या. घरी त्यांची मुलगी इतिश्री बरोबर होती. इतिश्री सांगते - सायंकाळी घरी एक फोन आला, तो बहुधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होता, तो फोन द्रौपदी यांच्या आईने घेतला. फोनवरील बोलणे ऐकताना आई एकदम शांत होती. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. काही काळ ती बोलू शकली नाही. ती धन्यवाद एवढेच त्यांना म्हणाली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निरोप मिळाल्यावर द्रौपदी म्हणाल्या, माझ्यासाठी, आदिवासी आणि महिलांसाठी हा क्षण ऐतिहासिक होता. झोपडीपासून ते देशाच्या सर्वोच्च पदाचे दावेदार म्हणूनच हा प्रवास लक्षणीय व अद्भुत आहे. एका मुलाखतीत द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे, त्या संथाल या आदिवासी समाजातून आल्या आहेत. त्यांचा परिवार खूप गरीब होता. घर चालविण्यासाठी एक छोटी नोकरी करावी एवढीच त्यांची इच्छा होती. त्यांना नोकरी मिळालीही.


पण सासरच्या लोकांनी सांगितल्यावरून त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी मुलांना विनामूल्य शिकवायला सुरुवात केली. इथूनच त्यांच्या समाजसेवेला सुरुवात झाली. १९९७ मध्ये रायरंगपूर नगरपंचायतीची त्यांनी निवडणूक लढवली. नगर परिषद जिंकली व त्या नगरसेविका झाल्या. सन २००० मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली व जिंकली. आमदार व मंत्री झाल्या. दरम्यान त्यांच्या एका मुलाचा एका दुर्घटनेत मृत्यू झाला व त्यातून त्यांना नैराश्य आहे. २०१३ मध्ये दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाला. २०१४ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. पाठोपाठ कुटुंबात दु:खाचे डोंगर कोसळत असताना त्याही खचून गेल्या होत्या. पण काही काळाने त्यांनी पुन्हा समाजसेवेत स्वत:ला गुंतवून घेतले. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून त्यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा दिली आहे. सीआरपीफच्या सशस्त्र जवानांची तुकडी त्यांच्या सुरक्षिततेसाठी तैनात आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होताच, त्या प्रथम जगन्नाथ मंदिरात व शिवमंदिरात गेल्या. तेथे स्वत: झाडू मारून मंदिर स्वच्छ केले व पूजा-अर्चना केली. मंदिरात स्वत: झाडू मारणारी आदिवासी महिला आता राष्ट्रपती भवनाच्या वाटेवर आहे.


[email protected]
[email protected]

Comments
Add Comment