
मुंबई : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट ची परीक्षा आज १७ जुलै रोजी होणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांपर्यंत नीटची परीक्षा पार पडेल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेपूर्वी एनटीए कडून नीट उमेदवारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
neet.nta.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या नोटीसद्वारे, एनटीए ने परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी पाळावयाच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल माहिती दिली आहे. मार्गदर्शक तत्त्वे परीक्षेला बसणारे उमेदवार कॅज्युअल कपडे घालू शकतात. विद्यार्थी चप्पल घालू शकतात. परंतु, विद्यार्थ्यांनी परिक्षेला बसताना बूट घालणे टाळावे. परीक्षा केंद्रात पारंपारिक कपडे परिधान करण्यास मनाई आहे. परीक्षेच्या वेळेच्या दोन तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांचे बायोमेट्रिक्स तपासले जाईल. त्यामुळे त्यांनी हलके कपडे परिधान करून केंद्रावर पोहोचावे जेणेकरून वेळ वाया जाणार नाही.
परीक्षेसाठी उमेदवारांनी निळ्या किंवा काळा बॉल पेन सोबत बाळगणे आवश्यक आहे. उमेदवारांनी नीट यूजी २०२२ प्रवेशपत्र स्व-घोषणापत्र आणि हमीपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. उमेदवारांना एक पारदर्शक पाण्याची बाटली आणि हँड सॅनिटायझरची ५० मिलीची बाटली बाळगण्याची परवानगी आहे. उमेदवारांना प्रवेशपत्रावर लावण्यासाठी पोस्टकार्ड आकाराचा फोटो किंवा एखादा अतिरिक्त फोटो घेऊन जाण्यास परवानगी आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेच्या वस्तू परीक्षा केंद्रावर नेण्यास मनाई आहे.