रमेश तांबे
टण टण टण असे तीन टोले पडले अन् परीक्षा सुरू झाली. मनालीच्या हातात गणिताचा पेपर पडला. तिने सारा पेपर भरभर नजरेखालून घातला. पेपर वाचता वाचता तिचा चेहरा बदलत गेला. उत्सुकतेची जागा आता भीतीने घेतली. मनालीने इकडे-तिकडे बघितले. सारी मुले मान खाली घालून लिहू लागली होती. आजचा पेपर अवघड आहे याची जाणीव तिला झाली. या पेपरमध्ये पास होणे कठीणच आहे. तिचं मन तिला खाऊ लागलं. मन विचारात पडलं अन् तिला सारं काही आठवू लागलं.
नुकतीच शाळा सुरू झाली होती. गणिताच्या बाई वर्गात शिकवायच्या तेव्हा मनालीचं अजिबात लक्ष नसायचं. तिच्या शेजारी बसणारी वृषाली तिची जानी दोस्त होती. दोघी वर्गात धमाल करायच्या. गप्पा मारणं, टवाळक्या करणं, कुणाला टपली मार, तर कुणाची वेणी ओढ, कधी-कधी वेड्यासारखे प्रश्न विचारून वर्गाचा वेळ वाया घालवत असे. शिक्षकांनी मनालीला खूप वेळा समजवलं होतं “वर्गात लक्ष दे! वृषालीच्या नादी लागू नकोस.” पण अनेक वेळा सांगूनही मनाली सुधारली नाही.
खरे तर वृषाली एक श्रीमंता घरची मुलगी होती. ती वर्गात फक्त मजा करायला यायची. वर्गातल्या अनेक मुलींना तिची भुरळ पडली होती. त्यातलीच एक मनाली! एका सर्वसामान्य कुटुंबातली. गरीब म्हणता येईल अशीच तिची घरची परिस्थिती होती.
मनाली तशी हुशार, विविध स्पर्धांमधून बक्षिसे मिळवणारी सर्वांची लाडकी विद्यार्थींनी होती. पण वृषाली शाळेत आली अन् मनाली सारं काही विसरून गेली. शिक्षक, आई, वडिलांचा सल्ला तिने कधीच मानला नाही. त्याचाच परिणाम आज तिच्या गणिताच्या पेपरमध्ये दिसत होता. वर्षभराच्या साऱ्या गोष्टी तिच्या डोळ्यांसमोरून सरकून गेल्या. मनात पश्चातापाची भावना निर्माण झाली. आपण चुकलो पण आता वेळ निघून गेली होती. अपयशाशिवाय आपल्या हातात दुसरे काही नाही, हे तिला कळलं होतं. आता तिला घाम फुटला. आई-बाबांना काय सांगायचं. नापासाचा शिक्का अंगावर घेऊन कसं राहायचं. तिचे डोळे पाण्याने भरून गेले. त्याच अवस्थेत तिने अर्ध्या तासातच पेपर बाईंकडे देऊन ती वर्गाबाहेर पडली. तिच्यासोबत वृषालीदेखील वर्गाबाहेर पडली. वृषालीने फोन करून गाडी मागावली अन् ती आपल्या घरी निघून गेली. मनाली चालू लागली. रस्ता नेईल तिकडे चालत राहिली. चालताना तिला भान नव्हतं. मन थाऱ्यावर नव्हतं. ती रस्त्याच्या अगदी मधोमध चालली होती. तेवढ्यात गाडीचा मोठा आवाज आला. तिने मागे वळून पाहिले, तर गाडी तिच्या अंगावर येता-येता जवळ येऊन थांबली होती. मनालीने जोरात किंकाळी फोडली आई गं! आई गं!
तशी आई मनालीच्या रूमकडे धावत आली आणि गालावर हलकेच चापटी मारीत म्हणाली, “मनू बाळ काय झालं. स्वप्नं बिप्नं पडलं की काय? चल ऊठ बघू. आज गणिताचा पेपर आहे ना तुझा! लवकर आवर अन् अभ्यासाला बस!” आपण घरातच आहोत अन् गणिताचा पेपर अजून व्हायचा बाकी आहे, हे बघून मनालीच्या चेहऱ्यावर हसू फुटले!