Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीपावसाळ्यातील कोकण वैभव

पावसाळ्यातील कोकण वैभव

अनघा निकम-मगदूम

गेले महिनाभर संपूर्ण राज्यासह कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. कोकणात तर दर दिवशी ‘रेड अलर्ट’, ‘ऑरेंज अलर्ट’ दिले जात आहेत. इतका अतिमुसळधार पाऊस सर्वत्र पडतोय. आंबा, काजूचा आस्वाद घेत कडक उन्हाळा सरला असून आता कोकणातला हा निसर्ग पावसाने न्हाऊन निघाला आहे. ताजातवाना झालाय. सगळीकडे हिरवळ पसरली आहे. निसर्गाने नवीन रूप धारण केलंय. उत्साह, उत्स्फुल्लता, आनंद असं भारलेलं वातावरण सध्या कोकणामध्ये ठाई ठाई पाहायला मिळत आहे.

जुन्या जीर्ण झाडांना पुन्हा सळसळतं तेज मिळालंय, तर अनेक ठिकाणी नवीन कोंब रुजू लागले आहेत. ही हिरवाई, हे घनदाट जंगल, हा निसर्ग कोकणचं शाश्वत वैभव आहे.

विकासाच्या अनेक आणि वेगवेगळ्या चर्चा जरी आपण कितीही केल्या असल्या आणि त्यातून कोकणी माणसाचा भौतिक विकास जरी होणार असला तरीही कोकणी माणूस त्याच्यासोबत कायम त्याचं हे निसर्गाचे वैभव बाळगत असतो आणि म्हणूनच कदाचित जगराहाटीच्या व्याख्येत बसणारं वैभव नसलं तरीही या निसर्गामुळेच कोकणी माणूस तितकाच वैभवशाली आणि श्रीमंत आहे, असं म्हटलं पाहिजे.

कोकणाचे हे रूप पावसाळ्यामध्ये सर्वाधिक विलोभनीय आणि खुलवणार असतं. नुसता हिरवा रंग देण्यासाठी पाऊस इथे बरसत नाही, तर निसर्गाचे अनेक रंग या पावसाळ्यामध्ये कोकणात बघायला मिळतात. या पावसाचा परिणाम इथल्या माणसांवर, इथल्या झाडांवर होतो. तो अगदी इथल्या कातळांवर सुद्धा झालेला पाहायला मिळतो, तो म्हणजे याच कालावधीत अनेक रानफुलं कोकणाच्या कातळावर फुलताना पाहायला मिळतात. एक वेगळं रानवैभव, कातळ वैभव इथे पाहायला मिळतं ते याच पावसाळ्याच्या काळामध्ये! अगदी छोटी, इटुकली पिटुकली, कदाचित जगात कुठेही न दिसणारी अशी अनेक फुलं कोकणातल्या कातळ सड्यावर पाहायला मिळतात ती याच दिवसात. त्यांचं हे वैभव, त्यांची ही श्रीमंती अवघ्या अगदी दोन दिवसांची किंवा दोन महिन्यांचीच असते. जसजसा पाऊस सरायला लागतो तसतसं हे वैभव अस्तंगत होतं, पुढच्या वर्षापर्यंत कायमचं मिटून जातं. पुन्हा पुढच्या वर्षी पाऊस पडतो, पुन्हा नव्या उमेदीने ही छोटी छोटी, वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यांची ही रानफुलं जागोजागी फुलतात आणि पुन्हा हे वैभव पाहायला मिळतं.

विशेषतः रत्नागिरी, राजापूर आणि मग पुढे तळकोकणात हा रानफुलांचा बहर पावसाळ्यामध्ये अनेकदा दिसून येतो. रत्नागिरीतील कातळशिल्पांचे शोधकर्ते भाई रिसबूड, धनंजय मराठे यांनी यासाठी विशेष काम केले आहे. धनंजय मराठे आणि भाई रिसबूड यांच्या कॅमेऱ्यामधून टिपलेली उत्तम रानफुलांची छायाचित्र त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच पाहायला मिळतात. त्यावर हे दोघेही भरभरून भाष्यसुद्धा करतात. या फुलांवरती अभ्यास होणं, संशोधन होणं गरजेचं आहे, असं म्हटलं जातं.

याबाबत बोलताना भाई रिसबूड यांनी सांगितले की, केवळ शोभिवंत किंवा डोळ्यांना छान दिसतात म्हणूनच या कातळफुलांचे अस्तित्व मर्यादित नाही, तर या फुलांचा मानवजातीला म्हणजेच स्थानिक कोकणी माणसालासुद्धा अदृश्य रूपाने उपयोग होत असतो. उन्हाळ्यात अन्य झाडांवर बहरलेल्या फुलांचा बहर पावसाळ्यात ओसरलेला असतो. अशावेळी या भागातील छोटे-छोटे पक्षी, कीटक यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झालेला असतो. हा प्रश्न ही पावसाळ्यातच फुलणारी कातळावरची इटुकली फुले सोडवत असतात. अवघ्या काही दिवसांचे आयुष्य असणाऱ्या या फुलांमुळे हे, पक्षी, कीटक अन्नासाठी त्यांचे स्थान सोडून न जाता, आहे तिथेच थांबून राहतात आणि पावसाळा संपला की, हेच कीटक परागीभवनासाठी, फलधारणेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अशा या महत्त्वाच्या पक्षी कीटकांना जगवण्याचे काम ही छोटी फुले करतात आणि हे कीटक जगतात म्हणून इथली वनसंपदा टिकून राहते. याशिवाय ही कातळावरची फुले नायट्रोजन किंवा नत्र जे वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाचे खत आहे. त्याचे घटक बनविण्याचे काम करत असतात. हे घटक पावसाच्या पाण्याने वाहत येऊन शेतीला किंवा बागायतीला मिळत असतात. यातूनच कोकणातील शेती किंवा बागायतीला नैसर्गिक खत निर्माण करून देण्याचे काम ही कातळावरची फुले करत असतात. त्याशिवाय ही फुले कातळावर पडून वेगाने वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवून धरण्याचे कामसुद्धा करतात. कातळ सर्वाधिक पाणी पितो. मात्र त्यासाठी वाहणारे पाणी थांबणे गरजेचे आहे, हे काम ही फुले करत असतात. त्यामुळे केवळ सुंदर दिसणंच नव्हे तर उपयोगी पडणे हा सुद्धा गुणधर्म असलेल्या आणि अल्प कालावधीसाठी फुलणारं, बहरणारं हे रानवैभव टिकवून ठेवणं, त्याचा जतन करणं, त्याची प्रसिद्धी करणं हे गरजेचे झालं आहे. कोकणातील पर्यटन विकासासाठीसुद्धा ते महत्त्वाचे आहे.

सातारामधली कास पठार आज जगप्रसिद्ध झाले आहे. तितकंच महत्त्व या कोकणातल्या रानफुलांना आहे. आपल्या आगळ्या वैशिष्ट्यांसह ही रानफुलं बहरत असतात. तसं तर कोकण म्हटलं की, फक्त मासे, आंबे आणि अशी काही मोजकीच ठळक वैशिष्ट्यं दिसतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून इथल्या कातळशिल्पांची ओढ वाढू लागली आहे. ही कोकणची नवी ओळख आहे. कोकणात आलं की इथे फक्त समुद्रकिनारेच नाहीत तर कोकणात अनेक सुंदर मंदिर आहेत, शिल्प आहेत, पर्यटन स्थळ आहेत आता ज्यांच्याकडे केवळ दगड किंवा कातळ म्हणून पाहिलं जायचं त्या कातळावर सुंदर, अचंबित करणारी शिल्पसुद्धा रेखाटली गेली आहेत. हेही आता जगाला हळूहळू कळू लागले. त्याचवेळी कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये जसे सुंदर धबधबे कोसळत असतात. तसंच या कातळ पठारावरती सुंदर आणि मानवला जगण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या उपयोगी पडणारी छोटी फुलंसुद्धा बहरतात हे आता जगाला कळणं गरजेचं आहे. हा फुलांचा बहर पाहणं, तो कॅमेरामध्ये कैद करून ठेवणं हा आनंदही अवर्णनीय आहे. अजूनही रानफुलांचा बहर असुरक्षित आहे, तितकाच दुर्लक्षित आहे; परंतु तो पर्यटकांना दाखवणं तर गरजेचं आहेच; परंतु तो या कालावधीत संरक्षित करणं सुद्धा गरजेचे आहे. कारण ती फुलं इतकी नाजूक असतात की त्यांना सांभाळणं गरजेचं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -